राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 05:29 IST2025-04-20T05:29:06+5:302025-04-20T05:29:54+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray News: महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची दोघांनीही दाखवली तयारी, राज विनाअट तर उद्धव ठाकरे यांनी मात्र घातली एक अट

राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
मुंबई : नव्या शिक्षण धोरणात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा केल्यानंतर उडालेल्या ‘मराठी’च्या धुराळ्याने महाराष्ट्राचे राजकारण तापत असताना आता राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत केलेले सुतोवाच आणि त्याला उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद या पार्श्वभूमीवर ही चर्चा यावेळी प्रत्यक्षात साकार होण्याची आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले. त्याला शनिवारी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना राज यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली त्यानंतर काही वर्षांतच दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याची चर्चा सुरू झाली. दोन्ही बंधू कुठे इतरत्र एकत्र दिसले की त्यांनी एकत्र यावे अशी चर्चा व्हायची.
राज ठाकरे काय म्हणाले?
महेश मांजरेकरांचा प्रश्न : तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचे स्वप्न आहे.
राज ठाकरे : महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात मला फार कठीण गोष्ट वाटत नाही.
हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणे आवश्यक आहे. मी पाहतोच आहे. माझे तर असे म्हणणे आहे की सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही.
उद्धवबरोबर मला काम करायला काहीच हरकत नाही, पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावे? (मांजरेकर - महाराष्ट्राची इच्छा आहे) महाराष्ट्राने जाऊन सांगावे तिकडे, मी असल्या छोट्या-छोट्या गोष्टीत माझा इगो मध्ये आणत नाही.
मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब असतील, उद्धव असेल. उद्धवबरोबर मला काम करायला हरकत नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या या विधानाला प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे : किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो आहे. पण माझी एक अट आहे..
महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे आगत स्वागत मी करणार नाही त्यांच्या घरी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी माझ्याकडून
भांडणे नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला.
महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत किंवा कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची.
हे ठरवा की, कोणासोबत गेल्याने महाराष्ट्राचे, मराठीचे आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे, माझ्याबरोबर की भाजपबरोबर ?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘नो कमेंट्स’
शिंदेसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरेगावात आहेत. त्यांना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी ते जाऊ द्या, कामाचे बोला, असे म्हणत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
अटी नव्हे, लोकभावना
उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटी नाहीत. महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, त्यांना
आपल्या घरात स्थान देता कामा नये, ज्यांनी शिवसेनेच्या पाठित वार केला त्यांना आपल्याकडे स्थान असता कामा नये, ही लोकभावना आहे, असे उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत म्हणाले.
आम्हाला आनंदच
जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले जुने मतभेद, भांडणे विसरून एकत्र येत असतील तर यात वाईट वाटायचे कारण नाही. पण त्यावर आम्ही काय बोलणार? त्यांनी ऑफर दिली, त्यांनी अटी टाकल्या यावर तेच बोलू शकतील. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री