आयएएसच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर!
By admin | Published: January 6, 2015 02:18 AM2015-01-06T02:18:21+5:302015-01-06T02:18:21+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मोठ्या प्रमाणात केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच मोठ्या प्रमाणात केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजी-नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काही बदल्या रद्द केल्या जातील की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
नगरविकास विभागातून महसूल विभागात गेलेले मनुकुमार श्रीवास्तव (प्रधान सचिव) आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे सूर कितपत जुळतील याबाबत विभागातील काही अधिकारी खासगीत शंका घेतात. प्रत्येक बाबतीत नियमावर बोट ठेवण्याचा श्रीवास्तव यांचा स्वभाव आहे. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नवे प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर यांच्याबाबतही असेच बोलले जात आहे. सतीश गवई यांना म्हाडातून आणून गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव केल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता नाराज असल्याचे सांगण्यात येते.
नगरविकास विभागात नितीन करीर आणि मनीषा म्हैसकर या दोन कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणून मुख्यमंत्र्यांनी चांगला संदेश दिला आहे. या खात्यात गेली काही वर्षे सोपे काम किचकट करून निर्णय लांबविण्याचा पडलेला प्रघात आता तरी मोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. महावितरणमधून पर्यावरण विभागात गेलेले अजय मेहता लवकरच प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाणार अशी चर्चा आहे. गौतम चटर्जी, देवाशिष चक्रवर्ती, अश्विनी भिडे अशा काही कार्यक्षम अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी अधिक विश्वास टाकल्याचे दिसते. तसेच मराठी अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक एस. एस. झेंडे यांना आघाडी सरकारच्या काळात बरेचवेळा ‘साईड पोस्टिंग’ दिली गेली. मात्र, भाजपा सरकारने त्यांना हाफकिन इन्स्टिट्यूटमधून उचलून म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद दिले आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू मानले गेलेले श्यामसुंदर शिंदे हे अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातदेखील सत्ताधाऱ्यांच्या नाराजीचे लक्ष्य बनले आणि त्यांना कमी महत्त्वाच्या पदांवर राहावे लागले. आता त्यांना पशुसंवर्धन आयुक्त पदावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त या महत्त्वाच्या पदावर पाठविण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले की वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या काही अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविताना त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार येता कामा नये, अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. अशा काही अधिकाऱ्यांना ‘क्रीम पोस्टिंग’ मिळाले असले तरी त्यांच्या कामावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून वर्धेचे उदय चौधरी यांना पाठविण्यात आले आहे. पण आधीचे कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनाच कायम ठेवावे, अशी भूमिका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि नाशिकच्या भाजपा आमदारांनीही घेतल्याने ही चौधरींची बदली रद्द होण्याची शक्यता आहे.