राज यांच्या कृष्णकुंजवर खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 03:50 AM2017-04-21T03:50:03+5:302017-04-21T03:50:03+5:30
एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण
मुंबई : एकीकडे लागोपाठचे पराभव आणि दुसरीकडे जुनीच दुखणी अशा कात्रीत सापडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुरुवारी ‘कृष्णकुंज’वर झालेली बैठक भलतीच वादळी ठरली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना प्रथमच पदाधिकाऱ्यांच्या परखड मतांचा आणिं रोषाचा सामना करावा लागला.
लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीने मनसेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज यांनी ‘कृष्णकुंज’वर पक्षाचे अन्य नेते आणि सरचिटणिसांची बैठक बोलावली. या बैठकीपूर्वी नेते-सरचिटणिसांनी मुंबईत विभागवार बैठका घेतल्या होत्या. त्यात पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. पक्ष नेतृत्वाच्या शैलीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सर्वाचे पडसाद कृष्णकुंजमधील बैठकीतही उमटले.
पक्षातील नाराजी परखडपणे मांडताना, तुमच्याकडून विविध विषयांवर पक्षाची भूमिकाच समोर येत नाही, असा थेट हल्ला मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यावर चढविला. यावर, मी भूमिका मांडतो. पण तुम्हीच माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडता, असा पलटवार राज यांनी केला. निवडणुकीत उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेवरही काही नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शिवाय, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवरील कारवाईचा मुद्दाही चर्चेला आला.
मुंबईतील बदलती समीकरणे पाहता मराठीप्रमाणेच अन्य भाषिकांनाही जवळ करण्याची आवश्यकता असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. यावर, मराठीचा मुद्दा अजिबात सोडणार नाही. उलट तो अधिक आक्रमक करणार असल्याचा इरादा राज यांनी व्यक्त केला. मी मराठीचा मुद्दा सोडू शकत नाही, भले मला लोकांनी मते देऊ देत किंवा नाही, असा पवित्रा राज यांनी घेतला. तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मानमर्यादा आणि कर्तव्यांचीही जाणीव करून दिली. (प्रतिनिधी)