राज यांचे भाषण पुरावा ठरत नाही -हायकोर्ट
By admin | Published: August 6, 2016 05:13 AM2016-08-06T05:13:54+5:302016-08-06T05:13:54+5:30
जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या मार्च २०१४मधील भाषणांची सीडी उच्च न्यायालयात पुरावे म्हणून सादर केली
मुंबई : बाळासाहेबांच्या इच्छापत्रावरून सुरू असलेल्या वादात आपली बाजू भक्कम करण्यासाठी जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या मार्च २०१४मधील भाषणांची सीडी उच्च न्यायालयात पुरावे म्हणून सादर केली, मात्र उच्च न्यायालयाने भाषण पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास नकार दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान सेंट्रल मैदानावर भाषण केले होते. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याचा आधार घेत जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या २०१४च्या भाषणाच्या सीडी पुरावे म्हणून वापरण्यात याव्यात, अशी विनंती न्या. गौतम पटेल यांच्याकडे केली. मात्र जयदेव ठाकरे व्हिडीओ क्लिपचे लेखक नाहीत किंवा निर्माते नाहीत. केवळ त्यांनी भाषणाची व्हिडीओ क्लिप सादर केली म्हणून ती पुरावा म्हणून स्वीकारणे शक्य नाही, असे म्हणत न्या. पटेल यांनी जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप पुरावे म्हणून सादर करून घेण्यास नकार दिला.
तरीही जयदेव यांच्या साक्षीदारांच्या यादीत राज यांचे नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०११मध्ये बाळासाहेबांनी तयार केलेल्या कथित इच्छापत्रानुसार, बहुतांशी संपत्ती उद्धव ठाकरे यांच्या नावावर केली आहे. या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)