“एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 05:31 PM2022-06-27T17:31:25+5:302022-06-27T17:33:05+5:30

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असे मनसे नेत्याने म्हटले आहे.

raju patil statement about rebel eknath shinde group merger in mns | “एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान

“एकनाथ शिंदे गट आणि मनसेत हिंदुत्वाचा समान धागा, त्यामुळे...”; मनसे नेत्याचे सूचक विधान

googlenewsNext

मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे गटाकडे विलिनीकरणाची वेळ आली, तर मनसेचा पर्यायाकडे सकारात्मकतेने पाहिले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवसेनेचा जो गट फुटलाय तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. ते मनसेबरोबर आपला गट विलीन करणार आहेत किंवा नाही याबाबत आपल्याला माहित नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे बोलणे झाल्याबद्दल मी माध्यमातूनच ऐकले, झाले असेल बोलणे, मला माहिती नाही. पण एकनाथ शिंदे गटाने जो हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आहे, तोच आम्ही मांडला होता त्यामुळे त्या मुद्द्यावर ते एकत्र येऊ शकतात. मात्र याबाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील, असे राजू पाटील म्हणाले.

राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक

राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार का, या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट बोलणे टाळले. परंतु त्याने या मुद्द्याचे खंडन केले नाही. सध्या यावर आता भाष्य करणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गट मनसेत विलीन होणार की नाही ही चर्चा कायम आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट अँड वॉचची भूमिका आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत दोनदा राज ठाकरेंना फोन केला आहे. यावेळी राज यांच्या प्रकृतीसोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यामुळे सत्तानाट्यात मनसेची एन्ट्री झाली आहे. एकनाथ शिंदे गटाला विलीनीकरण करायचे असल्यास त्यांच्यासमोर भाजप, प्रहार यांचा पर्याय होता. परंतु त्यात मनसे हादेखील चांगला पर्याय शिंदे गटाला ठरू शकतो याबाबत चाचपणी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे. 
 

Web Title: raju patil statement about rebel eknath shinde group merger in mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.