ज्यांना मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही, त्यांनी...; जयंत पाटलांवर भडकले राजू शेट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:27 PM2023-12-01T21:27:19+5:302023-12-01T21:28:14+5:30

राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्या कारखान्यातील प्रश्नावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Raju Shetti gets angry with Jayant Patil over farmers issue | ज्यांना मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही, त्यांनी...; जयंत पाटलांवर भडकले राजू शेट्टी!

ज्यांना मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही, त्यांनी...; जयंत पाटलांवर भडकले राजू शेट्टी!

सांगली : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राज्यभरातील विविध ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील या मोर्चांमध्ये सहभागी होत आहेत. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाटील यांच्या कारखान्यातील प्रश्नावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

"विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा पक्ष झाला आहे. आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे," असा हल्लाबोल राजू शेट्टींनी केला आहे. 

"जयंत पाटील यांच्या कारखान्यावर शेतकरी घामाच्या दामासाठी चिखलात बसला आहे. ज्यांनी एफ. आर. पी.चे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे पाप केले आहे. त्यावेळेस तुम्ही त्यांना पाठिंबा देत तोंड बंद करून बसलात. आज कारखाना सुरू होऊन जवळपास १ महिना झाला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न देण्यासाठी सत्ताधारी व विरोधी कारखानदारांना एकत्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नागव करण्यात येत आहे. यामुळे ज्यांना स्वत:च्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नसेल त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय हक्काची लढाई शिकवू नये," असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी केलेल्या या टीकेला जयंत पाटील उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Raju Shetti gets angry with Jayant Patil over farmers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.