राजू शेट्टी यांचे ठरले! विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ जागा लढणार, लवकरच ठिकाणे ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:17 PM2024-07-01T17:17:34+5:302024-07-01T17:18:40+5:30
Raju Shetti News: शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी प्रश्नांवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
Raju Shetti News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात भाष्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही. कोल्हापूर-नागपूर या महामार्गाला हा समांतर महामार्ग आहे. मग या महामार्गाची गरज काय? समृद्धी महामार्गाला जो मोबदला मिळाला, त्याच्या केवळ ४० टक्के मोबदला मिळणार आहे. राज्यात चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही. सर्व पक्षीय नेत्याच्या भूमिकेवर संशय आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत ३० ते ३५ ठिकाणी लढणार
आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ३० ते ३५ जागा लढू शकतो. परंतु त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्यात एका दिवशी २५० शेतकरी आत्महत्या होत आहे. हरितक्रांती चे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गावातही शेतकरी आत्महत्या झाली. हे या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
दरम्यान, सरकारने कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी समजून सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. कर्जबाजारी शेतकरी देश सोडून पळून जात नाही तर जीवन जगणे सोडून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या योजनांची घोषणा करतात. सामान्य माणसाचे जीएसटीचे पैसे जमा आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.