राजू शेट्टी काँग्रेस आघाडीसोबतच, ‘स्वाभिमानी’ला दोन जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:17 PM2019-03-14T15:17:49+5:302019-03-14T17:46:34+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी मागितलेल्या तीनपैकी लोकसभेच्या दोन जागा देण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संमती दिल्याने खासदार राजू शेट्टी हे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसोबतच राहणार असल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले.
विश्र्वास पाटील
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी मागितलेल्या तीनपैकी लोकसभेच्या दोन जागा देण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संमती दिल्याने खासदार राजू शेट्टी हे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसोबतच राहणार असल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले.
शेट्टी यांनी बुलडाणा, वर्धा किंवा सांगली यापैकीच कोणतीही एक जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरला आहे. त्यास दोन्ही काँग्रेसने प्रथमदर्शनी सहमती दिली आहे. दिल्लीत दोन्ही काँग्रेसची बहुधा आज शुक्रवारी बैठक होत आहे. त्यामध्ये या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. स्वत: शेट्टी यांनीही या घडामोडींना दुजोरा दिला. विदर्भातील जागा मिळण्यात अडचणीच जास्त दिसत असल्याने स्वाभिमानीच्या वाट्याला सांगलीची जागा येण्याची शक्यता आहे.
खासदार शेट्टी यांची यासंदर्भात कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी फोनवर चर्चा झाली. शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा यापूर्वीच सोडण्यात आली आहे. ही जागा आपल्या कोट्यातून सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता काँग्रेसने स्वाभिमानीला एक जागा सोडावी यावर एकमत झाले आहे.
बुलडाण्याची जागा स्वाभिमानीला सोडायची असेल तर काँग्रेसने ती आपल्याकडे घेवून स्वाभिमानीला सोडावी लागणार आहे. परंतू राष्ट्रवादी आजही बुलडाण्याची जागा सोडायला तयार नाही. ती सोडायची असेल तर मग काँग्रेसने आपल्याला औरंगाबादची जागा सोडावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे परंतू त्यास काँग्रेस तयार नाही असा हा गुंता आहे.
शेट्टी यांनी बुलडाणा, वर्धा किंवा सांगली यापैकीच एक जागा स्वाभिमानी पक्षाला मिळावी असा आग्रह धरला आहे. काँग्रेस वर्धा सोडणार नाही. कारण तिथे माजी प्रदेशाध्यक्ष प्रभाराव यांची कन्या चारुलता टोकस या प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसचा या मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे विदर्भातील या दोन जागांबध्दल अडचणीच जास्त दिसतात.
...तर इंद्रजित देशमुख मैदानात
विदर्भातील दोन जागा न मिळाल्यास काँग्रेसला सांगलीची जागा सोडण्याशिवाय पर्याय नाही. तसेही या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसकडे ताकदीचा व गटतटाच्या भिंती मोडून हवा निर्माण करू शकेल असा उमेदवार नाही. त्यामुळे संघटनेला जागा मिळाल्यास निवृत्त सरकारी अधिकारी व प्रभावी वक्ते इंद्रजित देशमुख यांना मैदानात उतरले जावू शकते, सध्या तरी या वळणावर हालचाली आहेत.