१६ जुलैनंतर मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टी यांनी फुंकले रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:11 AM2018-06-30T06:11:28+5:302018-06-30T06:11:38+5:30
राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय
पुणे/ कोल्हापूर : राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत न घेतल्यास १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल व त्यातून जी परिस्थिती उदभवेल त्यास सरकार जबाबदार असेल असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी टिळक चौक ते साखर संकुल दरम्यान विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी त्यामध्ये सहभागी झाले होते. मोर्चात शेतकºयांनी आसूड ओढून वेगळेच वातावरण तयार केले. शेतकरी आसूड ओढताना पुणेकर जनता उत्सुकतेने पाहत होती.
शेट्टी म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत आम्ही संयम ठेवला आहे. यापुढे शेतकºयांची लूट होऊ देणार नाही. १५०० कोटी रुपयांची उसाची थकीत एफआरपी येणे बाकी आहे. व्याजाची रक्कम शेतकºयांनी का द्यावी? एफआरपीची रक्कम देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कारखान्यांकडे तब्बल ६० कोटी थकीत आहे. ३० जुलैपर्यंत थकीत रक्कम देण्यात यावी अन्यथा मंत्र्यांच्या घरावर जप्ती आणावी लागेल.
मुख्यमंत्र्यांवरही टीकेची झोड
विदर्भात पिककर्ज देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाºयाने शेतकºयाच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली. परंतु त्यास लगेच जामीन मंजूर झाला याबद्दल संतप्त शब्दात समाचार घेवून शेट्टी म्हणाले,‘ असा प्रकार पुन्हा घडलाच तर जाग्यावर त्या अधिकाºयाचे डोळे फोडा, तरच शेतकºयाच्या पत्नीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणाची होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांना या घटनेचे कांहीच कसे वाटले नाहीत. ते झोपले आहेत का अशी विचारणा खासदार शेट्टी यांनी केली.