भाजप-शिवसेनेकडून जनमताचा अपमान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 06:29 PM2019-10-31T18:29:39+5:302019-10-31T18:30:16+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकार स्थापन करण्यास चालढकल करत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्टपणे बहुमत दिल्यानंतर त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
नवी दिल्ली येथे गुरुवारी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेनंतर शेट्टी बोलत होते. युतीने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री आणि मंत्रीपदांबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना आवश्यक जागा मिळाल्यानंतर सुरू असलेले मतभेद त्यांच्या उणीवा दाखवून देणारे आहे, असेही शेट्टी म्हणाले.
महाराष्ट्रात झालेली निवडणूक कोणत्याही मुद्द्याशिवाय लढली गेली. शेतकºयांच्या मुद्द्यावर विचार करायला कोणालाही वेळ नव्हता. महाराष्ट्रात महापुरामुळे जवळपास २५ टक्के शेतकरी हैराण झालेले आहेत. मान्सूननंतर परतीच्या पावसामुळे विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करवून घेण्याची जबाबदारी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र, फडणवीस यांना केवळ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही याची काळजी होती. कोणत्याही राजकीय पक्षाचे याकडे लक्ष नसने हे दुर्दैवी असल्याचे शेट्टी म्हणाले. एकाच टप्प्यात निवडणुका झाल्यामुळे विरोधकांना फटका बसल्याचेही शेट्टी म्हणाले.
हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमची लढाई सुरूच राहणार आहे, असेही शेट्टी म्हणाले. ‘आरसीईपी’मुळे दूध उत्पादकांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवरून दूध पावडर आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्याला संपविणारा ठरेल. मुक्त व्यापार पद्धतीद्वारे दूध पावडर आयात केल्याने दूधाचा भाव २२ रुपये लीटरवर येईल त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा दावाही शेट्टी यांनी केला.
३७०चा मुद्दा सत्ताधाऱ्यांवर उलटला!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे कलम ३७०च्या मुद्द्यावर भाषण केल्यामुळे विलास जगताप या उमेदवाराचा पराभव झाला. जनतेला पिण्यासाठी पाणी नसताना शहा यांनी ३७०चे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवाराला फटका बसला. या मुद्द्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ३७०मुळे भाजपच्या उमेदवारांना फटका बसल्याचा दावा शेट्टी यांनी केला.
विरोधकांचा सेनेला पाठिंबा?
काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेला पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. काही मुद्द्यांवर चर्चा शिल्लक आहे. मात्र, शिवसेनेने भाजपसमोर शरणागती पत्करल्यामुळे विरोधकांची नीति अपयशी ठरण्याची शक्यता असल्याचेही शेट्टी म्हणाले.