शेतमालाला दीडपट हमीभाव द्या - राजू शेट्टी
By admin | Published: July 10, 2017 04:48 AM2017-07-10T04:48:04+5:302017-07-10T04:48:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करू शकणार नाहीत, असे भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी किसान मुक्ती यात्रेदरम्यान झालेल्या सभेत वर्तविले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ६ ते १८ जुलै अशी मध्य प्रदेशातील मंदसौर येथून किसान मुक्ती यात्रा निघाली आहे. रविवारी यात्रा धुळ्यात आली. जय किसान आंदोलनाचे योगेंद्र यादव, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक डॉ़ सुनिलम, संयोजक व्ही़एम़सिंह, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. रविवारी सकाळी शहादा (जि. नंदुरबार) येथे सभा झाली.
धुळ्यात शेतकरी संघटनेचे नेते रवी देवांग यांनी रस्त्यालगत उभे राहून यात्रेला हात दाखवून थांबवले़ प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव यांनी रवी देवांग यांच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारले़
जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात बदलाची गरज
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी कायद्यात बदलासह अनेक अडथळे आहेत. खुल्या व्यवस्थेसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदलाची गरज आहे़, असे शेट्टी यांनी सांगितले.