सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारेल: राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:09 PM2019-12-03T17:09:08+5:302019-12-03T17:09:40+5:30
शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठे पद मिळणार, अशी चर्चा आहे. कृषिमंत्रिपदासाठी सध्या त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारण्यास शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे.
शेट्टी यांनी लोकसभेपासून काँग्रेस आघाडीशी केलेला घरोबा विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला. ‘वंचित बहुजन आघाडी’ची ऑफर असतानाही त्यांनी काँग्रेस आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना आघाडीच्या जागावाटपात सहा जागा मिळाल्या तरी, देवेंद्र भुयार यांच्या रूपाने त्यांचा एकच आमदार निवडून आला आहे. मात्र शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी असलेली बांधीलकी यांमुळे ते कृषिमंत्री या पदासाठी न्याय देऊ शकतील, अशी भावना आहे.
तर यासाठी राजू शेट्टी यांनी सुद्धा तयारी दर्शवली आहे. 'समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू,' अशी इच्छा स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांच्या हालचालींना सुद्धा वेग आला आहे. त्यामुळे अनेक नेते दिल्ली गाठून फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. तर याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.