राजू शेट्टी - प्रकाश आंबेडकर यांची हातमिळवणी?
By atul.jaiswal | Published: September 29, 2018 01:45 PM2018-09-29T13:45:33+5:302018-09-29T14:15:08+5:30
अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.
अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर या दोहोंमध्ये येत्या ६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे होणार असलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी युती केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी जवळपास निश्चित झाली आहे. युतीबाबत अॅड. आंबेडकर सकारात्मक आहेत. पुढील वाटाघाटासाठी खासदार राजू शेट्टी आणि अॅड. आंबेडकर यांच्यात मुंबई येथे ६ आॅक्टोबजर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे रविकांत तूपकर यांनी सांंगितले.
भारिपला काँग्रेसचे वावडे नाही
अॅड. आंबेडकर व रविकांत तूपकर यांच्यादरम्यान अकोला येथे पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध कडवट झाल्याचे पृष्ठभूमीवर अॅड. आंबेडकर यांनी भारिपला काँग्रेसचे वावडे नसल्याचे स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारिपमध्ये युती झाल्यास काँग्रेसलाही सोबत घेण्याला आपला विरोध नसल्याचे आंबेडकर यांनी रविकांत तूपकर यांना सांगितले.