मंत्रीपदाची मागणी केलीच नाही, पण शपथविधीला न बोलविल्याची खंत : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:45 AM2020-01-07T10:45:47+5:302020-01-07T10:47:26+5:30
राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.
मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले. मात्र या मंत्रीमंडळात घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी कामगार पक्ष यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे राजू शेट्टी नाराज असल्याचे वृत्त आले होते. मात्र आपण मंत्रीपद मागितलेच नसल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे.
भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजप ज्या पद्धतीने राजकारण करतोय, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भूमिका आम्ही घेतली होती. भाजप शेतकरीवविरोधी धोरण सातत्याने राबवत आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणे हे त्याचेच उदाहरण असल्याचे असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचा घटक म्हणून वावरत आहे. पण काम करत असताना आम्ही कधीही मंत्रीपद मागितले नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. तसेच किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तो कार्यक्रम ठरायला हवा, अशी आमची इच्छा आहे. मात्र माध्यमातून घटकपक्षांना आम्ही सामावून घेऊ अशा बातम्या तिन्ही पक्षांकडून पेरल्या गेल्या. त्याचवेळी शपथविधीला न बोलवणे ही असहिष्णुता तिन्ही पक्षांनी दाखवल्याची खंत शेट्टी यांनी बोलून दाखवली.
दरम्यान राजकारण आमच्या पोटापाण्याचा धंदा नाही. त्यामुळे भाजप चांगले आहे म्हणून आम्ही त्याच्यासोबत जाऊ असं काहीही नाही. आम्ही चळवळीतील लोक आहोत. आम्ही चळवळीतच राहू असे स्पष्टकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.