प्रकाश आंबेडकरांबरोबर राजू शेट्टींची झाली चर्चा; वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 11:46 PM2018-10-06T23:46:10+5:302018-10-06T23:46:29+5:30
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती केली.
मुंबई : भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती केली. शेट्टी यांनी मात्र भाजपाच्या विरोधात एकच महाआघाडी असावी, असे मत या भेटीत व्यक्त केले.
आंबेडकर यांचा पक्ष आणि एमआयएमने एकत्रित येऊन वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यात सहभागी होण्याची विनंती करण्यासाठी अॅड. आंबेडकर यांनी खा. शेट्टी यांची भेट घेतली. देशात काँग्रेसच्या नेतृत्वात भाजपाविरोधी पक्षांची महाआघाडी आकाराला येत आहे. अशावेळी महाराष्ट्रात तिसरी आघाडी केली तर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपाला होईल, अशी भूमिका शेट्टी यांनी या भेटीत मांडली.
आपण एकत्र आलो तर भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस आघाडीलादेखील सक्षम पर्याय उभा करू शकू, असे आंबेडकर यांनी शेट्टींना सुचविले. मात्र, शेट्टी यांनी त्या बाबत कुठलाही निर्णय दिला नाही. आ. कपिल पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते.