माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो! राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 06:00 PM2019-09-27T18:00:02+5:302019-09-27T18:02:14+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा देत भाजपाच्या वाटेवर असल्याने राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. तसेच स्वाभिमानीच्या शिलेदारांनी ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो, अशी साद घातली आहे. तसेच भाजमधील पक्षांतरावरही टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बहुतेक सर्वच राजकीय नेते व कार्यकर्ते सत्तेच्या दिशेने पळत सुटताना दिसत आहेत. जे येत नाहीत त्यांच्या मागे चौकशीची ईडापिडा लावली जाते. आर्थिक कोंडी केली जाते आणि त्यानांही नाईलाजाने भरती व्हावे लागते. अशा पध्दतीने महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहतोय काय नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.देशातील राजकीय वाटचाल एकपक्षीय राजवटीच्या दिशेने निघालेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
याचबरोबर विरोधी पक्षाची गरज सांगताना त्यांनी सत्ता कोणाचीही असो विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आधार असतो. तो आधारच काढून घ्यायचे राज्यकर्त्यांनी ठरविलेले दिसते. अशा परिस्थितीमध्ये स्वाभिमानीच्या शिलेदारांनी सर्वसामान्यांचे ज्वलंत प्रश्न घेऊन मैदानात ऊतरून त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. चळवळ करणे हे इतके सोपे राहिले नाही हे तुम्हाला चार वर्षांत लक्षात आलेले आहेच. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाव्या लागतील, खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल कालपर्यंत बरोबर असणारा माणूस फोडून घेतील आपल्या विरोधात एवढेच ते करू शकतात. आपण थोडेच ईडी, इन्कमटॅक्स, सी.बी.आयला घाबरणारे आहोत? एकमेकांबद्दल गैरसमज पसरविणे, द्वेष निर्माण करणे यामध्ये त्यांची खासियत आहे. अशा या वादळात खवळलेल्या तुफान समुद्रात स्वाभिमानीचा दिवा घेऊन मी आपलं गलबत समुद्रात सोडलेले आहे. दिवा विझू न देता जहाज किनाऱ्यावर न्यायचं आहे. मोठमोठ्या लाटा येत आहेत किनारा येणार आहे कि नाही मला माहित नाही. मी या जहाजाचा कॅप्टन आहे. किनारा गाठण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर जहाज बुडायला लागले तर ज्यांना लाईफ जॅकेट मिळाले त्यांनी त्याचा अवश्य स्वीकार करावा, असे सांगत दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच एकत्र काम केल्यानंतर एकमेकांना शिव्याशापही देत बसू नका असे सांगितले. माझे किंवा माझ्या सहकाऱ्यांचे काही निर्णय कदाचित चुकले असतील पण त्यामागे व्यक्तीगत स्वार्थ निश्चितच नव्हता व असणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.