राजू शेट्टी यांचा भाजपाला दणका; सेनेला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2017 12:26 AM2017-02-16T00:26:01+5:302017-02-16T00:26:01+5:30
भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी
मुंबई : भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजपाला धडा शिकविण्यासाठी नाशिक, पिंपरी-चिंचवड व पुण्यात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.
या निवडणुकीत मित्रपक्षांना जागा सोडण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात जागा वाटपाची साधी चर्चाही केली नाही. पुण्यात तर रिपाइंच्या उमेदवारांना परस्पर कमळाचे चिन्ह दिले. त्यामुळे मित्रपक्षाचे नेते भाजपावर नाराज आहेत.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका असलेल्या व त्यांच्याविषयी सहानुभूती असलेल्या उमेदवारांना मदत करण्याची भूमिका स्थानिक पातळीवर घ्यावी, अशी सूचना खा. राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार, दोन जिल्ह्यांत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे युवक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी सांगितले. नोटाबंदीचा ग्रामीण भागाला विशेषत: शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतमालाचे भाव गडगडले आहेत. भाजपाप्रणित सरकार काहीही भूमिका घेण्यास तयार नाही, असा आरोप संघटनेकडून होत आहे.