...तर शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; राजू शिंदेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:23 IST2025-04-02T15:22:51+5:302025-04-02T15:23:30+5:30
फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणायचं आणि तडजोडीचं राजकारण करायचे. ईमानदारीने जे काम करतायेत त्यांना भूलवत राहायचे. त्यामुळे खैरेंचे खरे रूप मी बघितलं आहे असा गंभीर आरोपही राजू शिंदे यांनी केला.

...तर शिवसैनिक चंद्रकांत खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत; राजू शिंदेंचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील ठाकरे गटाविरोधातील उमेदवारांना फायदा होईल असं चंद्रकांत खैरे यांनी राजकारण केले. खैरेंमुळेच पक्षाचे उमेदवार पराभूत झाले असा आरोप करत जर मी सत्य सांगितले तर मूळचे शिवसैनिक खैरेंना रस्त्यावर फिरू देणार नाहीत असा इशारा राजू शिंदे यांनी दिला आहे. राजू शिंदे यांनी अलीकडेच उद्धवसेनेच्या पदांचा राजीनामा देत पक्षातून बाहेर पडले.
राजू शिंदे म्हणाले की, पक्षातील पदांचा राजीनामा देण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. पक्षात प्रवेश केल्यापासून आतापर्यंत ज्यारितीने पक्षातील पदाधिकारी, वयोवृद्ध पदाधिकारी, माजी खासदार यांच्या स्वभावामुळे मला पक्षात जमत नाही, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा द्यावा असा निर्णय घेण्यात आला. मी माझी नाराजी व्यक्त केली. ४ वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल मला बोलायचं नाही. ते बोलले तर बघू. मी नाराज का आहे हे खैरेंना माहिती आहे. खैरेंनी खरे काय ते मांडावे. मी जर खरे सांगितले तर जे निष्ठावंत आणि मूळ शिवसैनिक आहेत ते त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय मला वादात पडायचे नाही. ज्याप्रकारे निवडणुकीत शिवसैनिकांनी माझ्यासाठी काम केले त्यांचा मी ऋणी आहे. मतदारांचे आभार आहे. शिवसैनिकांचे काही काम असेल ते मी करेन. उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी शब्द दिला तो पाळला. परंतु मला पाडण्यासाठी कुणी प्रयत्न केले, मलाच नाही तर मराठवाड्यातील उमेदवार कुणामुळे पडले हे जनतेलाही माहिती आहे. खैरे किती फिरले, किती सभा घेतल्या, किती बैठका घेतल्या? फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणायचं आणि तडजोडीचं राजकारण करायचे. ईमानदारीने जे काम करतायेत त्यांना भूलवत राहायचे. त्यामुळे खैरेंचे खरे रूप मी बघितलं आहे असा गंभीर आरोपही राजू शिंदे यांनी केला.
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनीच पक्षाचे उमेदवार पाडले. मी यावर बोलणार नव्हतो परंतु जर खैरे आणखी काही बोलणार असतील तर मीदेखील बोलेन. चंद्रकांत खैरे यांनी भद्रामारूतीची शपथ घ्यावी त्यांनी काय केले सगळ्यांना माहिती आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात समोरच्या उमेदवाराला फायदा होईल असं खैरेंनी काम केले. उद्धव ठाकरेंवर जे बोलले त्यांची छुपी मदत केली. बरेच जणांना हे माहिती आहे परंतु ते उघडपणे बोलत नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिकांना जशी वागणूक मिळायला हवी तशी चंद्रकांत खैरे देत नाही असंही राजू शिंदे यांनी सांगितले.