राजवर्धन यांच्या राजकीय प्रवेशाला तूर्त ‘रेड सिग्नल’

By admin | Published: August 2, 2015 11:17 PM2015-08-02T23:17:23+5:302015-08-03T00:08:29+5:30

जयंतरावांचे संकेत : शिक्षण अगोदर, नंतर राजकारण..! शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशंसेची मोहोर

Rajvardhan's official entry to the 'Red Signals' | राजवर्धन यांच्या राजकीय प्रवेशाला तूर्त ‘रेड सिग्नल’

राजवर्धन यांच्या राजकीय प्रवेशाला तूर्त ‘रेड सिग्नल’

Next

अशोक पाटील -इस्लामपूर राजकारण म्हणजे समाजसेवा, हे समीकरण राहिलेले नाही. राजकारण हा व्यवसाय झाला आहे. राजकारणाला गुणवत्ता लागत नाही. सध्या राजकारणाला चांगले दिवस नाहीत. राजवर्धनची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. तो लंडनमधील एका नामांकित संस्थेत शिक्षण घेणार आहे. त्याला राजकारणात आणण्याचा सध्या तरी विचार नाही, असे मत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी उरुण परिसरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन शिक्षणासाठी परदेशात निघालेल्या जयंत पाटील यांना राजकारणात आणले. त्यावेळी त्यांना तालुक्यातील काही नेत्यांनी विरोधही केला होता. वाळवा तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु याला स्वत: जयंत पाटील यांच्याकडूनच नकार आहे. परंतु जयंत पाटील यांच्या नकारात होकार असतो, हे त्यांच्या समर्थकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
सध्या सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांची राजकीय ताकद वाढत आहे. त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील मुंबई येथे उद्योग क्षेत्रात आहेत. जयंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून सध्या तरी कोणी नाही. त्यांच्याच घरातील जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना जयंतरावांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली आहे. परंतु देवराज यांचा जिल्हा पातळीवर पाहिजे तेवढा प्रभाव दिसला नाही, तर कासेगाव जि. प. मतदारसंघात काही गावातून त्यांना विरोध होत असल्याचे दिसते.
जयंतरावांंनी राजारामबापू उद्योग समूहासह काही क्षेत्रात पै-पाहुण्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिलीपतात्या पाटील यांना दिले. राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांना राज्य पातळीवरील संस्थेवर वर्णी लावण्यासाठी जयंत पाटील यांचेच मोठे योगदान आहे. हे दोन्ही नेते ज्येष्ठ असल्याने ते जयंतरावांचे राजकीय वारसदार होऊ शकले नाहीत.
वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वासाठी यापूर्वी झालेले अंतर्गत मतभेद राज्यातील राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. त्याचबरोबर या नेत्यांच्या राजकीय वारसदारांचीही चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वारसांमध्ये मतभेद आहेत. आर. आर. पाटीलही आपला राजकीय वारस तयार करण्यात अयशस्वी ठरले. पतंगराव कदम यांनी विश्वजित कदम यांना आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. आता जयंतरावांच्या वारसदाराची चर्चा सुरू झाली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा विषय...
जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश म्हणजे अचानक घडलेली घटना म्हणावी लागेल. अद्याप त्यांचे पुत्र राजकारणात सक्रिय झाले नसले तरी, त्यांच्या राजकीय प्रवेशाचा विषय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा बनला आहे.

Web Title: Rajvardhan's official entry to the 'Red Signals'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.