राज्यसभा: महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:54 PM2022-05-30T12:54:01+5:302022-05-30T13:13:18+5:30
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरु होते. आता चित्र स्पष्ट झाले आहे. संभाजीराजेंनी माघार घेतल्याने भाजपाने कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांचे नाव घोषित केले. महाडिकांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी आम्ही मतांची बेगमी केल्याचा दावा केला आहे.
राज्यातील जे वातावरण पाहता महाविकास आघाडीतील आमदार, नेते नाराज आहेत. त्यांच्यात असंतोष आहे. यामुळे त्याचा फायदा भाजपाला होईल. हे आमदार भाजपाला मतदान करतील, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.
भाजपाकडे स्वत:ची ३०-३२ मते आहेत. जिंकण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. १,२,३,४ अशा पद्धतीने मतदान होणार आहे. यात भाजपाचा हातखंडा आहे. तिसरी जागा ही भाजपाचीच होती. फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी जादाच्या १० मतांची तयारी केली आहे, असे महाडिक म्हणाले.
संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज यांनी संभाजीराजे आणि भाजप यांच्यातील छुप्या युतीचा गौप्यस्फोट केला आहे. संभाजीराजेंमुळे राजकीय नुकसान नको म्हणून शिवसेनेने मराठा समाजाचे आणि कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपानेही त्यांच्याविरोधात धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली आहे. यामुळे निवडणूक राज्यसभेची असली तरी कोल्हापूरच त्याच्या केंद्रस्थानी आले आहे.