Rajya Sabha Election : महाविकास आघाडीला चीतपट करण्यात फडणवीसांना यश, धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार यांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 04:23 IST2022-06-11T03:58:23+5:302022-06-11T04:23:29+5:30
Rajya Sabha Election : शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे.

Rajya Sabha Election : महाविकास आघाडीला चीतपट करण्यात फडणवीसांना यश, धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार यांचा पराभव
मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) शुक्रवारी मतदान झाले. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरशी पाहायला मिळाली. याचबरोबर, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीची ९ ते १० मतं मिळवण्यात यश आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे. महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.
आमदारांना फोडण्यात भाजपला यश
महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे. दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.