Sambhajiraje Chhatrapati: लक्ष्य २०२४... आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार! संभाजीराजेंचं पोस्टर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:28 PM2022-05-25T15:28:19+5:302022-05-25T15:38:20+5:30
राज्यसभेसाठी संभाजीराजेंना भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा जाहीर न केल्याने त्यांची कोंडी झाली असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई: आताच्या घडीला देशासह राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा जाहीर न केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना मराठा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. या संघटनांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेतील उमेदवारीसाठी अगोदरच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे संभाजीराजे यांचे समर्थकाही प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा नाकारल्याने मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांचे एक पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे.
शिवसेना असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, मी त्या पक्षांत थेट प्रवेश करणार नाही. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचे निश्चित केले असून, या पक्षांनी मला पाठिंबा द्यावा हीच ठाम भूमिका घेऊन मी पुढे जात आहे. महाविकास आघाडीने माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्यास माझी तयारी आहे. परंतू, थेट कोणत्याच पक्षात मी प्रवेश करणार नाही असे संभाजीराजे छत्रपती यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तसेच खासदारकीसाठी मी अगतिक आहे, असे अजिबातच नाही. शिवशाहूंचा विचार, मराठा व बहुजन समाजाचे प्रश्र्न घेवून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून माझे कार्य सुरुच राहील, असेही ते म्हणाले होते.
संभाजीराजेंचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल
सध्या संभाजीराजे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले जात आहे. हे पोस्टर अल्पावधीत व्हायरल झाले आहे. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार, असा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे. या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना आणि महाविकासआघाडीला एकप्रकारे इशारा देण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मुंबईत तळ ठोकून आहेत. आता मराठा संघटनांचे सर्व समन्वयक मुंबईत दाखल झाल्यानंतर एकत्र बसून आगामी रणनीती आखली जाईल, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेने संभाजीराजे यांच्याशी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरात शिरू, असा इशाराही मराठा संघटनांकडून देण्यात आला. या धुमश्चक्रीत संभाजीराजे पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.