शिवसेनेकडून सहाव्या जागेची 'फाईल क्लोज'; संजय राऊत यांनी जाहीर केला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:33 PM2022-05-24T16:33:41+5:302022-05-24T17:41:30+5:30

rajya sabha election 2022 : शिवसेनेने कोल्हापुरातले शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केला आहे.

rajya sabha election 2022 sanjay pawar final shivsena 6th candidate from kolhapur, announced by sanjay raut | शिवसेनेकडून सहाव्या जागेची 'फाईल क्लोज'; संजय राऊत यांनी जाहीर केला उमेदवार

शिवसेनेकडून सहाव्या जागेची 'फाईल क्लोज'; संजय राऊत यांनी जाहीर केला उमेदवार

googlenewsNext

मुंबई :  राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याचबरोबर, संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. संजय पवार हे शिवसेनेचे मावळे आहेत, मावळे असतात म्हणून राजे असतात, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे संभाजीराजे छत्रपती यांना टोला लगावला. तसेच, संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीस वर्षांपासून संजय पवार शिवसेनेत सक्रिय आहेत. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत आणि त्या निवडून येतील, असे संजय राऊत म्हणाले.

राजांना पक्षाचं वावडं असू नये - संजय राऊत
मुख्यमंत्री नक्कीच संभाजीराजेंचा आदर ठेवतील. आम्ही त्यांचा आदर ठेवण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून लढण्याचा प्रस्ताव दिला. संभाजीराजेंना अपक्ष लढायचं असेल तर त्यांच्याकडे 42 मतं असतील. आमच्याकडे प्रस्ताव आला त्यावेळी गादीचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान याचा विचार करुन त्यांना प्रस्ताव दिला होता. तसेच, आम्ही कुणाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जबाबदार नाही, प्रीतिश नंदी, एकनाथ ठाकूर आणि प्रियांका चतुर्वेदी हे पक्षाचे उमेदवार होते. यापूर्वी शाहू महाराज यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले आहेत. मालोजीराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले आहेत, राजांना पक्षाचं वावडं असू नये, असे संजय राऊत म्हणाले.

(Exclusive Interview: खासदारकीसाठी अगतिक नाही; अपक्ष म्हणूनच राज्यसभा लढवणार; संभाजीराजेंचा निर्धार)

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी अलीकडेच भाजपला रामराम ठोकून स्वत:ची संघटना स्थापन केली. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मात्र, या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची पुढची भूमिका काय असेल, याकडेही लक्ष लागले आहे. 

कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचे काम जोमाने केले. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. 

Web Title: rajya sabha election 2022 sanjay pawar final shivsena 6th candidate from kolhapur, announced by sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.