हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:52 AM2022-06-07T06:52:03+5:302022-06-07T06:52:27+5:30

rajya sabha election 2022 : आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.     

rajya sabha election 2022 : Shiv Sena MLAs in Mumbai! Demonstration again today | हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

हालचालींना वेग; बॅगा घेऊन शिवसेनेचे आमदार मुंबईत! आज पुन्हा शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

मुंबई : सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना सोमवारी वेग आला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी त्यांची सोय ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 
आयसोलेशनमध्ये असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना फोनाफोनी केली.  भाव वाढलेले अपक्ष आमदार वेगवेगळी वक्तव्ये करून लक्ष वेधून घेत आहेत.     
कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई लढायची. कुणालाही घाबरायचे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. 

आज पुन्हा शक्तिप्रदर्शन
- मंगळवारी सायंकाळी नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व तसेच सहयोगी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना वांद्रे-कुर्ला संकुलात अशाच पद्धतीने तीनही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली होती. त्यातून आपले संख्याबळ आघाडीने दाखवून दिले होते. 
- अशाच पद्धतीचे शक्तीप्रदर्शन या बैठकीतून करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.

सुप्रिया सुळे यांनी घेतली जोरगेवारांची भेट
- वेगवेगळी राजकीय विधाने करून चर्चेत असणारे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 
- राज्यसभेसाठी घोडेबाजार होत आहे. हे दुर्दैवी आहे. आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहेत हा अन्याय आहे. दोघांना मतदानाची संधी मिळावी यासाठी छगन भुजबळ प्रयत्न करीत असल्याचे सुळे यांनी सांगितले.

शेवटच्या पाच मिनिटात मतदान : बच्चू कडू
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलून धानखरेदी सुरू करावी, अन्यथा निवडणुकीत शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, असा गर्भित इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत मुख्यमंत्र्यांना दिला. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पत्ते गुलदस्त्यात
तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून घोडेबाजार, पटोले यांचा आरोप
भाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील. - नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस

Web Title: rajya sabha election 2022 : Shiv Sena MLAs in Mumbai! Demonstration again today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.