तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपाकडं किती मते आहेत?; चंद्रकांत पाटलांनी आकडा सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:57 PM2022-06-02T16:57:45+5:302022-06-02T16:59:06+5:30
महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला मतदान होणार आहे. राज्यात भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. त्यात भाजपाने तिसरा उमेदवार देऊन या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. भाजपाकडे २ जागा सहज निवडून येतील असं मतांचे संख्याबळ आहे तर तिसऱ्या जागेसाठी काही अपक्ष आणि इतर पक्षांची मदत भाजपाला घ्यावी लागणार आहे. तर महाविकास आघाडीला त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.
त्यातच भाजपानं तिसऱ्या उमेदवारासाठी किती मते आहेत हे स्पष्ट केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) म्हणाले की, भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे. महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही असं सांगत त्यांनी मविआ आमदारांना अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे.
तर अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही. अशा स्थितीत आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली तसेच महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा, असे आमचे आवाहन असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा पत्रकारांशी संवाद. https://t.co/E9i1tX7tM5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 2, 2022
घोडेबाजार होणार नाही - अजितदादा
राज्यसभेची निवडणूक ही मते दाखवून मतदान केले जाते त्यामुळे घोडेबाजार होणार नाही. राहिला प्रश्न अपक्ष मतदान दाखवत नाही. त्यामुळे ही चर्चा सुरू आहे. कमी पडणारी मते शिवसेना(Shivsena) आणि भाजपला लागणार आहेत. काही अपक्ष सेनेशी संलग्न आहेत तर काही आमच्याकडे आहेत. काही भाजपकडेही आहेत. त्यामुळे घोडेबाजारच्या अशा चर्चा सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले.