Rajya Sabha Election: 'पक्षाला आज माझी गरज', गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 10:50 AM2022-06-10T10:50:15+5:302022-06-10T10:59:42+5:30
Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सहापैकी पाच जागेवरील उमेदवारी सहज विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षांसाठी एक-एक मत महत्वाचं आहे. यामुळेच पुण्यातील भाजप आमदार गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत.
राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजप यांच्यात सामना रंगल्याने सर्वच पक्षांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, भाजपचे दोन आमदार चक्क रुग्णवाहिकेतून विधान भवनात पोहोचले आहेत. सकाळीच पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानभवनात उपस्थिती लावली, कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही रुग्णवाहिकेतून येऊन मतदार केले.
काय म्हणाले जगताप?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृती ठीक असेल तरच या, असं सांगितलं होतं. आज पक्षाला गरज आहे. डॉक्टरांनीही प्रवास करु शकतात असे सांगितले आहे. त्यामुळेच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला," अशी माहिती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
लक्ष्मण जगताप यांना गंभीर आजार
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त आहेत. असे असतानाही पक्षाला आपली गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना 2 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.