राज्यसभा निवडणूक: भाजपा की मविआ, बविआची मतं कुणाला? हितेंद्र ठाकूर यांनी केली मोठी घोषणा, सस्पेन्स वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 04:54 PM2022-06-04T16:54:42+5:302022-06-04T16:55:51+5:30
Rajya Sabha Election: तीन मते असलेल्या बहुजन विकास आघाडीनेही भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यातील कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणी निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.
विरार/मुंबई - सहा जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक अनिवार्य झाली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार असून, एक एक मत मौल्यवान असल्याने भाजपा आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातच आता एकेका मताला महत्त्व आल्याने अपक्ष आणि छोट्या पक्षांनी सस्पेन्स वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यातच तीन मते असलेल्या बहुजन विकास आघाडीनेही भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यातील कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणी निर्णय घेऊ, असे जाहीर केले आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा कुणाला असेल याबाबत प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या विचारणेवर उत्तर देताना हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी भाजपा आणि मविआच्या टॉपच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यांचे प्रतिनिधी मला भेटत आहेत. त्यांचे उमेदवार भेटत आहेत. बोलत आहेत. मात्र मी स्पष्ट सांगतो की, आतापर्यंत मी कुणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. १० तारखेला मतदाना दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत माझ्याकडे वेळ आहे. दोन मिनिटं आधीही आमचा निर्णय होईल. त्यासाठी १० दिवस हा खूप वेळ आहे. मात्र माझ्यासाठी भाजपा, असो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, कुठलाही पक्ष अस्पृश्य नाही, असं हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
सध्याच्या आकडेवारीनुसार सहा जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे दोन तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. मात्र सहाव्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेने आपला उमेदवार दिल्याने निवडणूक लागली आहे. भाजपाकडे स्वत:ची २२ तर सहकारी पक्ष आणि अपक्षांची ७ मतं आहेत. तर महाविकास आघाडीच्या रूपात शिवसेनेकडे २६ मतं आहेत. त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांवर दोन्ही पक्षांची मदार आहे.