राज्यसभा निवडणूक: मैदान दिल्लीचे, मल्ल कोल्हापूरचे, जिंकले वस्ताद फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:55 AM2022-06-12T05:55:46+5:302022-06-12T05:57:32+5:30
मैदान दिल्लीचे, दोन्ही मल्ल कोल्हापूरचे आणि जिंकले मात्र भाजप आखाड्याचे वस्ताद देवेंद्र फडणवीस... अशीच काहीशी कुस्ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिली.
विश्वास पाटील
कोल्हापूर :
मैदान दिल्लीचे, दोन्ही मल्ल कोल्हापूरचे आणि जिंकले मात्र भाजप आखाड्याचे वस्ताद देवेंद्र फडणवीस... अशीच काहीशी कुस्ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिली.
संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत लढाईची तलवार उपसली आणि तेव्हापासूनच कोल्हापूर या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले. या विजयाने फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रात बहुजन समाजातील नेतृत्व भाजपमध्ये तयार केले. भाजप महाडिक यांना केंद्रात मंत्रिपदही देऊ शकतो. या कुस्तीत झालेल्या खडाखडीचे, डाव-प्रतिडावाचे पडसाद आगामी राजकारणात उमटणार आहेत.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत फडणवीस लाटेला कोल्हापूरकरांनी थोपवले होते. आता महाडिक यांना खासदार करून त्यांनी भाजपचे सत्ताकेंद्र या जिल्ह्यात निर्माण केले. त्याचा फायदा भाजपला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांत महाडिक, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, समरजित घाटगे यांची गट्टी भाजपचे तगडे आव्हान उभे करू शकते. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वारुला रोखण्याचे काम महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप ताकदीने करू शकेल. ज्या जिल्ह्यातील नेता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, तोच जिल्हा भाजपमुक्त झाला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्थानिक राजकारणात जी मुत्सद्देगिरी करावी लागते, ती करताना मर्यादा येत होत्या. आता महाडिक यांच्या रूपाने नवे खमके नेतृत्व तयार झाले.
धोबीपछाड डावावर केले चितपट
संभाजीराजे यांच्यामुळेच कोल्हापूर या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले. खरे तर ही लढत मल्लांची नव्हतीच. ती राजकीय आखाड्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस या वस्तादांची होती. त्यामध्ये फडणवीस यांनी धोबीपछाड डावावर महाविकास आघाडीला चितपट केले. बारा दिवसात महाडिक यांना राज्यसभेचे खासदार करून दाखविले.
उद्योजक खासदार झाला असता
शिवसेनेने संभाजीराजेंना शिवबंधन बांधण्याची अट घातल्यावर सगळे राजकारण फिरले. त्यांनी बंधनात राहण्यास नकार दिला. संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक असतात, त्यामुळे त्यांना डावलून या समाजात वेगळा मेसेज जायला नको म्हणून शिवसेनेने मराठा समाजातील सामान्य मावळा म्हणून संजय पवार यांना रिंगणात उतरवले. शिवसेनेने कोल्हापूरचा उमेदवार दिला म्हणूनच भाजपनेही महाडिक यांना उमेदवारी दिली. संभाजीराजेंची उमेदवारी चर्चेत आली नसती तर कदाचित कोणी उद्योगपती खासदार झाला असता.
नाव ‘महादेव’ मला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही - महाडिक
‘मला कोणीही संकटात आणू शकत नाही, परमेश्वराने मनात आणले तरच महाडिक संकटात येईल. आई-वडिलांनी माझं नाव ‘महादेव’ ठेवलं, मला कोणीही धक्का पोहोचवू शकत नाही. जिल्ह्याचे राजकारण फिरून माझ्याभोवतीच आले, हे ध्यानात ठेवावे’, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिला.
धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीनिमित्ताने आमच्या कुटुंबातील २२ मुले मुंबईत आहेत. आपण पूर्वी जे पेरले तेच आता उगवत आहे. राजकारणाची दिशा जरी बदलत असली, तरी चांगले राजकारणच येथे टिकणार आहे, असेही महादेवराव महाडिक म्हणाले.