Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:13 PM2022-06-03T15:13:15+5:302022-06-03T15:52:04+5:30

आता अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

Rajya Sabha Election: Fight between Shiv sena BJP for 6th Rajya Sabha seat | Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

googlenewsNext

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून आता चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागे न घेतल्यानं आता येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेची उमेदवारी मागे घ्या विधान परिषदेची जागा सोडू असा प्रस्ताव दोन्हीकडून एकमेकांना देण्यात आला. परंतु राज्यसभेची उमेदवारी मागे न घेण्यावर मविआ आणि भाजपा ठाम राहिल्याने काहीही तोडगा निघू शकला नाही. 

आता अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या राजकारणात दोन्ही बाजूने आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करत आहेत. आमच्याकडे तिसऱ्या उमेदवारासाठी ३० मते जादा आहेत. त्यामुळे आता अपक्ष, इतर पक्षांच्या मदतीवर आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच इतर पक्षाच्या कुठल्याही आमदारांशी आमचा संपर्क नाही. ही आमची कार्यपद्धती नाही. पक्षाच्या आमदाराला प्रतोदाला मत दाखवावे लागते. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष, छोट्या पक्षातील मतांवर गणित आहे. ही निवडणूक भाजपा जिंकणारच आहे. कायदेशीर अडचणी आल्या तरी काहीजण भाजपाला मतदान करणार असेल तर त्यांना मदत करू असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले परंतु त्याला यश मिळालं नाही त्यामुळे १० जून रोजी या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार आहे. 

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील - शिवसेना

घोडेबाजार रोखण्याचा महाविकास आघाडीने प्रयत्न केला. शिवसेनेचा दुसरा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार असून महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचा उमेदवार निवडून येईलच. सामोपचाराने मार्ग निघाला असता तर दोघांसाठी चांगले होते. आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही निवडणुकीला घाबरतोय असं नाही. केंद्रात तुमचं सरकार तसे महाराष्ट्रात आमचं सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी अपक्ष, इतर पक्षातील आमदारांशी कामे केल्यानं हे आमच्यासोबत आहे. आता यांना फूस लावण्याचे, केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावण्याचे प्रकार आमच्या कानावर आले आहेत. आम्ही आमचं काम करत राहू. निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागेल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच आमदारांना पळवण्याची वेळ कुणावरही येणार नाही. असे प्रयत्नही कुणी करू नये. गुप्त मतदान असल्याने क्रॉस व्होटिंग होते. यावेळी तसे नाही. त्यामुळे पक्षाची मते फुटणार नाहीत. आमच्याकडे लहान पक्ष, अपक्षांच्या मतांची आकडेवारी आहे. निवडणुका म्हटल्यावर बैठका होतात. अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. विरोधी पक्ष सरकार अस्थिर करण्याचा अनेक प्रयत्न करत आहेत. खेचाखेची व्हावी, आमिष दाखवण्याची संधी मिळावी यासाठी भाजपाचं राजकारण सुरू आहे. लोकशाहीत या सर्वाला सामोरं जायचं असतं असंही संजय राऊत म्हणाले. 
 

Web Title: Rajya Sabha Election: Fight between Shiv sena BJP for 6th Rajya Sabha seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.