Rajya Sabha Election : "लोकशाहीची निखळ थट्टा करण्याची कधीही न संपणारी गाथा पाहिली...", जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 03:03 IST2022-06-11T03:01:53+5:302022-06-11T03:03:45+5:30
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचे मत वैध ठरविण्यात आले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Rajya Sabha Election : "लोकशाहीची निखळ थट्टा करण्याची कधीही न संपणारी गाथा पाहिली...", जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा
मुंबई : आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी (Rajya sabha election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. यासंदर्भातील भाजप आमदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र देत, जितेंद्र आव्हाडांचे मत बाद करण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांचे मत वैध ठरविण्यात आले. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून भाजपवर हल्लाबोल केला. "आज आपण सर्वांनी मतदानाच्या मूलभूत अधिकाराची आणि मोठ्या प्रमाणावर धोक्यात आलेल्या लोकशाहीची निखळ थट्टा करण्याची कधीही न संपणारी गाथा पाहिली... खरी संयमाची परीक्षा होती...", असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाआधी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आपण राज्यसभेसाठी मतदान करताना कोणतीही चूक केली नाही. मतदान करताना जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया आपण केली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
Today we all witnessed a neverending saga of sheer mockery of the fundamental right of voting & largely the endangered Democracy....
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 10, 2022
It was a real test of patience...#RajyaSabhaElection2022#RajyaSabhaElections#maharastra#DemocracyMurdered
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीला शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नाट्यमय घडामोड घडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. तर शिवसेनेकडून रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांनी मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाची रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांची मते वैध ठरविण्यात आली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो. यानंतर मी गेटवर आलो. तोवर माझ्यावर कसल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले नव्हते. यानंतर मला माध्यमांकडून समजले, की माझ्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे. मात्र, यासंपूर्ण प्रक्रियेत माझ्याकडून काही चूक झाल्याचे मला तरी वाटत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. उगाच महाराष्ट्रासमोर असे जायला नको, की आम्ही काही वेगळे केले आहे, काही चुका केल्या आहेत, अजिबात नाही. काही कारण नसताना काहीतरी रडीचे डाव टाकत आहेत. माझ्या मते, माझ्याकडून कसलीही चूक झालेली नाही. माझे मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचे असते, नियमाने त्यांना मतदान दाखवले. ते न दाखवल्यास माझा पक्ष मला सहा वर्षांसाठी निंलंबित करू शकतो. माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.