Rajya Sabha Election: जिंकल्यावर पार्टी करू, मुख्यमंत्र्यानी सांगितले; ५० मिनिटांच्या बैठकीत काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 10:26 PM2022-06-07T22:26:52+5:302022-06-07T22:27:37+5:30
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हॉटेल ट्रायडंटला मविआच्या आमदारांची बैठक बोलावली.
मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत ७ उमेदवार असल्याने शिवसेनेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडीक यांच्यात थेट लढत आहे. केवळ एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपानं सगळी ताकद पणाला लावली आहे. यातच शिवसेनेने सर्व आमदारांना हॉटेल ट्रायडंट ठेवले आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हॉटेल ट्रायडंटला मविआच्या आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला १२ अपक्षांनीही हजेरी लावली होती. ५० मिनिटं चाललेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मतदान करताना काळजी घ्या, आपलं ऐक्य दाखवा आपल्याला विजयाची पार्टीही करायची आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितले
बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीला जाणार आहेत. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा होती. मात्र २२-२४ वर्षांनी ही निवडणूक होतेय. बिनविरोध निवडणुकीची परंपरा पाळणं गरजेचे होते असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी आपल्याकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या राज्यसभा निवडणूक बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया #RajyaSabhaElection2022#UddhavThackeraypic.twitter.com/XNu24yO1zJ
— Lokmat (@lokmat) June 7, 2022
बैठकीत काय घडलं?
संध्याकाळी ६ वाजता हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होती. यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह समर्थक आमदारांची उपस्थिती होती. या बैठकीला सुरूवातीला शरद पवार, जयंत पाटील उपस्थित झाले. त्यानंतर अजित पवार आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे, एच के पाटील यांचे आगमन झाले. या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. सत्तापिपासू लोकांना आपल्याला दूर ठेवायचं आहे. जिंकल्यावर आपण पार्टी करू, विजयोत्सव करायचा आहे असं सांगितले.
तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. अनेक अपक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे चारही उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास आहे. मते बाद होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रतोदाला मतदान दाखवून करायचं आहे त्यामुळे काही गडबड होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.