Rajya Sabha Election: १ लाखाची पैज लावा, भाजपाचे तिन्ही उमेदवार जिंकणारच; नेत्याच्या PA ची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:56 PM2022-06-10T17:56:58+5:302022-06-10T18:08:30+5:30
अरविंद देशमुख यांनी स्वतःच फेसबुक अकाउंट आणि व्हाट्सएपच्या स्टेट्सवरून लोकांना चॅलेंज करणारी पोस्ट केली आहे.
प्रशांत भदाणे
जळगाव - राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. विधानसभेच्या २८५ सदस्यांनी मतदान केले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात चुरस आहे. मात्र तत्पूर्वी भाजपा नेत्याच्या एका पीएने स्टेटस ठेवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरणात चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना आहे.
आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच जळगावातील भाजपच्या एका कार्यकर्त्यानेही लक्ष वेधलंय. हा कार्यकर्ता दुसरा तिसरा कुणी नाही तर भाजपा नेते गिरीश महाजन यांचा पीए अरविंद देशमुख आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे तिघे उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास अरविंद देशमुख यांना आहे. म्हणून त्यांनी सोशल मीडियावर थेट चॅलेंज देऊन एक लाख रुपयांची पैज लावण्याचं आव्हान केलंय.
अरविंद देशमुख यांनी स्वतःच फेसबुक अकाउंट आणि व्हाट्सएपच्या स्टेट्सवरून लोकांना चॅलेंज करणारी पोस्ट केली आहे. त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा आहे. भाजपा नेते गिरीश महाजन हे आपल्या बेधडक कृतीने सतत चर्चेत असतात आता त्यांच्या पीएने केलेलं चॅलेंज चर्चेत आलंय. फेसबुकवरच्या पोस्टला लोकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.
...तोपर्यंत मतमोजणी होणार नाही!
राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपलं आहे. राज्यातील एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. निवडणूक मतदानाची प्रक्रिया संपली असली तरी मतमोजणीसाठी विलंब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी ४ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण त्यास आता विलंब होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी घ्यावी लागते असा नियम आहे. यासंदर्भातील परवानगी अद्याप आलेली नाही. त्यामुळे जोवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची परवानगी येत नाही तोवर मतमोजणीला सुरुवात होऊ शकत नाही.