Rajya Sabha Election: हनुमान चालीसा दाखवली म्हणून रवी राणांचे मत बाद करावं: शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 07:38 PM2022-06-10T19:38:42+5:302022-06-10T19:39:32+5:30
भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही तक्रार दाखल केली आहे.
मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मोठी रंगत आली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी २८५ आमदारांनी मतदान केले. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ जणांनी मतदान प्रक्रियेच्या नियमांचे भंग केल्याचा आरोप करत भाजपाने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. जोवर निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही तोवर मतमोजणी प्रक्रिया खोळंबली आहे. त्यात आता शिवसेनेनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याची बातमी समोर आली आहे.
शिवसेनेनेही रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदानावेळी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त मुनगंटीवार यांनी इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवली. तर रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखवून मतदान केले. हनुमान चालीसा दाखवून इतर कुणाला मतदान केले हे उघड करणं नियमांचे भंग आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे ही मते बाद करावीत अशी तक्रार शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे.
रवी राणा म्हणाले होते की, मी १०१ वेळा हनुमान चालीसेचं पठण करून विधान भवनात आलो आहे. याठिकाणी भाजपाच्या तिन्ही उमेदवाराचा विजय होईल. ज्यांनी वारंवार हनुमान चालीसा, रामाचा अवमान केला. माझ्यावर राजद्रोह दाखल केला. हनुमान चालीसेचं पुस्तक खिशात घेऊन जाणे, विधान भवनात जाणे हा गुन्हा आहे का? असं त्यांनी म्हटलं आहे. तर राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला, आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आता शिवसेनेनेही तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने व्हिडिओ फुटेज मागवलं आहे. व्हिडिओ पाहून पुढील निर्णय होईल. परंतु या प्रक्रियेला किती वेळ लागेल सांगता येत नाही. मात्र राज्यसभेच्या निवडणूक मतमोजणीला ब्रेक लागला आहे. कदाचित या मतमोजणीला मध्यरात्र किंवा उद्या सकाळही उलटू शकते असं म्हटलं जात आहे. भाजपा आमदार पराग अळवाणी यांनी महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेत ही मते बाद करावीत अशी मागणी केली. तर भाजपाचे नेते बावचळेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी केला. परंतु आता याबाबत भाजपाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे