Rajya Sabha Election Result: 'त्या' अपक्ष आमदारांना निधी देणार नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:52 PM2022-06-11T19:52:43+5:302022-06-11T19:53:06+5:30
राज्यसभेत भाजपाचे तिन्ही उमेदवार जिंकून आले. त्यानंतर आता या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत
बुलढाणा- राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीसोबत शिवसेनेला मोठा झटका बसला. या निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मविआकडे संख्याबळ असताना त्यातील काही अपक्ष आणि घटक पक्षांची मते फुटली आणि त्याचा फायदा भाजपाला झाला.
राज्यसभेत भाजपाचे तिन्ही उमेदवार जिंकून आले. त्यानंतर आता या निकालावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ज्या अपक्ष आमदारांची मते मविआच्या उमेदवाराला पडली नाहीत अशांना निधी देणार नाही अशी भूमिका मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विधानावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार म्हणाले की, अपक्ष आमच्यासोबत होते, राज्यसभा निवडणुकीत दगाफटका झाला. कोण कोण त्यांच्यासोबत गेले याची माहिती मिळतेय. जर आमच्यासोबत राहून निधी उपलब्ध करून घ्यायचा, विकासकामे करून घ्यायची. मग बाकीच्या मार्गाने मते विरोधकांना द्यायची. आम्ही या आमदारांना कसाला निधी देऊ असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच सरकार म्हणून काम करताना अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्हीही सरकारच्या वतीने त्यांच्या मतदारसंघाना निधी उपलब्ध करून दिला. लोकशाही आहे कोण कुठे आणि कोणत्या मार्गाने जावं हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
कुठला आमदार दुखावला जाणार नाही हे पाहावं लागेल
राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. आमचा प्रयत्न होता, पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे. संजय राऊत यांचीच अडचण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० ची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत. पवारांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली. मविआचा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. तिथल्या आमदाराला तो दुखावला जाणार नाही, त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. एकोप्याने पुढे जावं लागेल असंही छगन भुजबळ म्हणाले.
संजय राऊत काठावर वाचले
तर मविआच्या आमदारांना, जिल्ह्यातील पालकमंत्री यांना विश्वासात घेऊन काम करावं. जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे. आम्ही एकमेकांच्या टांगेत टांग टाकता कामा नये. नाहीतर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात. तो पर्यंत कोणी बोलत नाही. मुख्यमंत्री भेटत नाही असं मी म्हणणार नाही. त्यांचे ऑपरेशन झालं आहेत. संजय राऊत यांनी मते न देणाऱ्यांची नावे घेतली ठीक आहे. आता त्यांना आपण पुढच्या कामासाठी जवळ कस करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. संजय राऊत(Sanjay Raut) काठावर वाचले. आणखी उलट झालं असत. आमचं नशीब नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते. आम्ही तर आमच्या लोकांना सगळं समजावून सांगितलं होतं. मात्र त्यातून या चुका कशा झाल्या, काय माहिती असंही भुजबळ यांनी सांगितले.