अपक्ष, छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव वाढला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 03:54 PM2022-06-03T15:54:21+5:302022-06-03T15:55:41+5:30
या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर त्याचे पडसाद राज्यातील सरकारवर पडू शकतात.
मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणीही माघार न घेतल्याने अखेर १० जूनला निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ आणि भाजपाकडून ३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मविआ उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. या निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक येत असल्याने सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या निवडणुकीची मदार आता अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्यावर अवलंबून आहे. यात समाजवादीचे २, प्रहार पक्षाचे २, स्वाभिमानी १, बहुजन विकास आघाडी ३, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १ तर मनसे १ या आमदारांच्या मतांकडे सगळ्यांचे लक्ष असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रतोदाला दाखवून मत द्यायचं असल्याने पक्षाची मते फुटण्याची शक्यता फार कमी आहे. त्यातच जर कुणी नाराज आमदाराने पक्षाच्या विरोधात जात मत देण्याचं धाडस केले तर त्या आमदाराला कायदेशीर पाठबळ देण्याची तयारी भाजपाची आहे असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानं मते फुटणार का? हे १० तारखेला समोर येणार आहे.
या निवडणुकीत भाजपानं ३० मते असल्याचा दावा केला असून त्यांना तिसऱ्या उमेदवारासाठी १२ मतांची गरज पडणार आहे. तर शिवसेनेकडेही पुरेसे मतं नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि इतर छोट्या पक्षाच्या मतांवर सहाव्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येणं त्यांच्यासाठी गरजेचे आहे. कारण त्यावर सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
भाजपाचं गणित
एकूण आमदार १०६
समर्थक अपक्ष आमदार ४
सहकारी आमदार ३
एकूण ११३ आमदार
भाजपाचे सहकारी पक्ष - शेकाप, रासप आणि जनसुराज्य प्रत्येकी १
मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत
अधांतरी पक्ष - मनसे १, माकप - १ आणि एमआयएम २
महाविकास आघाडीचं संख्याबळ
शिवसेना- ५५(जास्त मते १३)
राष्ट्रवादी ५३(जास्त मते ११)
काँग्रेस ४४(जास्त मते २)
एकूण १५२(जास्त मते २६)
वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार
महाविकास आघाडी समर्थक पक्ष - प्रहार २, समाजवादी-२, स्वाभिमानी १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष १, बहुजन विकास आघाडी ३ अशी मतं आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडला तर त्याचे पडसाद राज्यातील सरकारवर पडू शकतात. मविआकडे संख्याबळ कमी आहे हे जर भाजपाला कळालं तर त्याचा धोका महाविकास आघाडी सरकारला होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतल्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली होती. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत कुणाचं पारड जड आहे हे भाजपा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळणार आहे.