EXCLUSIVE: राज्यसभेसाठी संभाजीराजेंना खो?... राष्ट्रवादीने दिला पाठिंबा, पण शिवसेनेचा 'थांबा'; भाजपा घेणार थेट 'पंगा'?
By यदू जोशी | Published: May 17, 2022 12:44 PM2022-05-17T12:44:42+5:302022-05-17T12:50:01+5:30
पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्कीच निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे.
>> यदु जोशी
मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला असला तरी काँग्रेस आणि शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत संभाजीराजेंच्या पाठिंब्यावरून अद्याप एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच भाजपाने संभाजीराजे यांना पाठिंबा न देता तिसरा उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे.
आमच्याकडील अतिरिक्त मते संभाजीराजे छत्रपती यांना देण्यात येतील, अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे. शिवसेनेने अजून पत्ते उघडलेले नाहीत. स्वत:चा उमेदवार निवडून आणूनही शिवसेनेकडे १३ अतिरिक्त मते आहेत. ती मतं, भाजपच्या कृपेने राज्यसभेवर गेलेल्या संभाजीराजे यांना का द्यायची?, त्यापेक्षा स्वत:चा उमेदवार उभा करावा आणि राष्ट्रवादीने अतिरिक्त मते शिवसेनेच्या तिसऱ्या उमेदवाराला देऊन आघाडीधर्म पाळावा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. काँग्रेसकडील दोन अतिरिक्त मते आणि अपक्ष आमदारांच्या बळावर आपला तिसरा उमेदवार निवडून येऊ शकतो, असं गणित ते मांडत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीने संभाजीराजे यांना पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेने अद्याप तो दिलेला नाही. राज्यसभेच्या सहाही जागांबाबतचा निर्णय महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे व्हायला हवा होता, पण राष्ट्रवादीने परस्पर भूमिका जाहीर केली यावरूनही शिवसेनेत तीव्र नाराजी असल्याचे समजते.
पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्कीच निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. संभाजीराजे यांना या सहाव्या जागेसाठी पाठिंबा देण्यावरून भाजपात अंतर्गत सहमती नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच ते राज्यसभेवर जाऊ शकले, पण सहा वर्षांत त्यांनी भाजपाच्या व्यासपीठावर जाण्याचे शक्यतो टाळले. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत त्यांनी मदत केली नाही, अशीही स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांची तक्रार होती. याउलट खासदार उदयनराजे भोसले यांनी कोल्हापुरात रोड शो केला होता.
भाजपकडे स्वत:ची अतिरिक्त २२ मते आहेत. भाजपाला सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. अन्य अपक्ष आणि लहान पक्षांची मते खेचून आणू शकेल असा 'वजनदार' सहावा उमेदवार द्यावा, संभाजीराजे यांना पाठिंबा देऊ नये असा मोठा मतप्रवाह भाजपामध्ये आहे. मात्र त्याचवेळी , संभाजीराजे यांना पाठिंबा दिला नाही तर एका मराठा नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांनी डावलले, या संभाव्य टीकेबाबत पक्षातील काही नेत्यांना भीती वाटते. त्यावर तोड म्हणून सहावा मराठाच उमेदवार भाजपने द्यावा म्हणजे त्या टीकेलाही काही अर्थ राहणार नाही, असाही एक मतप्रवाह भाजपामध्ये आहे.
संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचाच असेल तर काही अटींवर द्या. ते भाजपमध्येच राहतील, पक्षात सक्रिय योगदान देतील या पूर्वअटी मान्य करून घ्या, असा दबावही पक्षातून आहे. संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय प्रदेश भाजपाने अद्याप घेतलेला नाही. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले की, पाठिंब्याचा निर्णय पक्षाने अद्याप घेतलेला नाही. भाजपाची प्रदेश कोअर कमिटी आणि पक्षश्रेष्ठी हे एकूणच राज्यसभा निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतील.
संभाजीराजे छत्रपती यांनी काल उरणचे भाजप समर्थित आमदार महेश बालदी यांची भेट घेतली. तेव्हा बालदी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली. मात्र, त्याचवेळी हेही सांगितले की, मी सही देतो पण माझ्या मताबाबतचा अंतिम निर्णय माझे नेते देवेंद्र फडणवीस हेच घेतील. विनय कोरे, राजेंद्र राऊत या भाजप समर्थक अपक्ष आमदारांनीही हेच उत्तर संभाजीराजे छत्रपती यांना दिल्याचे समजते. राज्यसभेचा तिसरा उमेदवार द्यावा की नाही याचा सर्वस्वी निर्णय दिल्लीतील भाजपश्रेष्ठी घेतील. या आधी राज्यसभेचे उमेदवार निश्चित करताना सगळे काही केंद्रातच ठरते आणि राज्यातील नेतृत्वाला निरोप तेवढा दिला जातो असा अनुभव आहे. याबाबत सर्वात उत्तम उदाहरण दिले जाते ते अमर साबळे यांचे. काहीसे अडगळीत पडलेल्या साबळेंना अचानक राज्यसभेची 'लॉटरी' लागली होती. कोण उमेदवार असावा म्हणून प्रदेश भाजपची कोअर कमिटी चिंतन करीत असतानाच अचानक दिल्लीतून फोन आला की, एक दलित नाव पाठवा आणि साबळेंना शोधून खासदारकी दिली गेली होती.