Rajya Sabha Election: शिवसेना आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर; तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:01 PM2022-06-09T20:01:25+5:302022-06-09T20:02:04+5:30
शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे
मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांवर होणाऱ्या निवडणुकीतील मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. या निवडणुकीत प्रत्येक पक्ष आपापल्या आमदारांना एकाच छताखाली आणत आहे. मतदानात कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी पक्ष खबरदारी घेत आहे. शिवसेनेने या निवडणुकीत २ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांना गेल्या ३ दिवसांपासून मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला ठेवण्यात आले आहे. कधी ट्रायडंट तर कधी रिट्रिट हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार राहत आहेत. २ दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांसह महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंटला पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे १ आमदार गैरहजर होते. त्यानंतर औरंगाबादच्या सभेतही या आमदाराने उपस्थिती लावली नाही. त्यामुळे हे आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गैरहजर राहणाऱ्या शिवसेना आमदाराचं नाव तानाजी सावंत असं आहे.
तानाजी सावंत यांच्या नाराजीची चर्चा पहिल्यांदाच होते असं नाही. यापूर्वीही तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीत शिवसेनेचा अपमान होतोय त्यामुळे पक्षप्रमुखांनी विचार करावा असं विधान केले होते. मंत्रिपद मिळत नसल्यानेही तानाजी सावंत(Tanaji Sawant) नाराज असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर महाविकास आघाडीत असूनही सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
आपल्या सडेतोड वक्तव्यांनी सातत्याने अडचणीत येणारे तानाजी सावंत हल्ली माध्यमांसमोर येत नाहीत. त्यात राज्यसभा निवडणूक इतकी महत्त्वाची असताना पक्षाच्या बैठकीला दांडी लावल्याने तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न निर्माण होतो.
अलीकडे शिवसंपर्क अभियानानिमित्त तानाजी सावंत यांनी उस्मानाबादेत म्हटलं होतं की, सहा महिनेच मंत्री होतो या कडेपासून त्या कडेपर्यंतच्या जिल्ह्याने आपली कार्यपद्धती पाहिली आहे. पक्षाचा आदेश आला आणि आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार केले. राज्यात जवळपास ७० टक्के जागांवर शिवसेनेने राष्ट्रवादीविरोधात लढा दिला. हे आपल्या लक्षात असले पाहिजे असं त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादीचे लोक इथे अधिकाऱ्यांपुढे ताठपणे बसून आदेश देत असतात. शिवसैनिकांची तशी परिस्थिती राहिली नाही. याची खंत मनात आहे. नशिबात असेल तर मंत्री होईन, नाही तर नाही. पण माझ्या शिवसैनिकांची मान खाली जाऊ देणार नाही. शिवाय माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही असंही तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले होते.