Rajya Sabha Election: महाविकास आघाडीला अपक्षांचं बळ, ट्रायडंटमधील शक्तिप्रदर्शनात एवढ्या अपक्ष आमदारांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 08:25 PM2022-06-07T20:25:06+5:302022-06-07T20:26:20+5:30
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली आहे.
मुंबई - राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावल्याने निवडणुकीला काही दिवस उरले असताना महाविकास आघाडीचं पारडं चांगलंच जड झालं आहे. तर भाजपाला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार या निवडणुकीत भाजपाचे दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येणार आहे. मात्र शिवसेनेने दुसरा तर भाजपाने आपला तिसरा उमेदवार दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. तसेच भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. तर आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन केले आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीसाठी खास रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ट्रायडंटमध्ये आयोजित या बैळकीला एकूण ११ अपक्ष आमदार उपस्थित राहिले आहेत. त्यामध्ये किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे, गीता जैन, मंजुळा गावित, आशिष जयस्वाल यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडे त्यांच्या कोट्यातील उमेदवारांना मतदान केल्यानंतर एकूण २६ मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला १६ मतांची गरज आहे. आता ११ अपक्ष आमदारांनी उपस्थित राहून पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचे पारडे काहीसे जड झाले आहे.