राज्यसभेचा आज फैसला, ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, कोणाचा पत्ता कटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:40 AM2022-06-10T06:40:10+5:302022-06-10T06:40:42+5:30
Rajya Sabha Election 2022 : मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक शुक्रवारी होत असून महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. सात उमेदवार रिंगणात असल्याने पत्ता कोणाचा कटणार, या बाबत प्रचंड उत्सुकता आहे. मतदानाला विधानभवनात सकाळी ९ ला सुरुवात होईल. रात्री ८ पर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.
आपल्या कोणत्याही आमदाराचे मत बाद ठरू नये म्हणून प्रत्येक पक्ष डोळ्यात तेल घालून खबरदारी घेत आहे. कशा पद्धतीने मतदान करायचे, दुसऱ्या पसंतीची मते देताना काय काळजी घ्यायची, हे आमदारांना समजावून सांगत मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपकडून आमदारांची पळवापळवी होऊ शकते हे गृहीत धरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.
देशमुख, मलिक यांच्या मतदानाचा आज फैसला
२८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनामुळे २८७ सदस्य आहेत. कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने तो फेटाळला. दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा फैसला शुक्रवारी सकाळी होणार आहे.
या दोघांना मताधिकार न मिळल्यास? पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ४१ इतका असेल. मताधिकार मिळाला तर ४२ चा कोटा असेल.
काँग्रेसच्या आमदारांची बडदास्त
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आमदारांचा मुक्काम असलेले हॉटेल गाठून तेथे आमदारांशी चर्चा केली. खरगे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या नेत्यांनी राष्ट्रपती निवडणुकीसोबतच राज्यसभा निवडणुकीबाबतही शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली.
देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन
भाजप व समर्थित अपक्ष आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी हॉटेलवर पोहोचून आमदारांना मार्गदर्शन केले.
रिंगणातील उमेदवार
भाजप : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार धनंजय महाडिक
शिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार
राष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल
काँग्रेस : इम्रान प्रतापगडी