घराण्यात फूट पाडण्याचा इतिहास जुना; संभाजीराजे छत्रपतीचं रायगडावरून सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:27 PM2022-06-06T19:27:53+5:302022-06-06T19:28:31+5:30
शिवाजी महाराजही म्हणाले माझ्या वडिलांवर एवढा दबाव आहे. स्वराज्य स्थापन करत असताना घराण्यात फूट पाडायची हा इतिहास जुना आहे असं त्यांनी म्हटलं.
रायगड - राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर खुद्द संभाजीराजे यांच्या वडिलांनी त्यांचे कान टोचले. या संपूर्ण प्रकरणावर अखेर शिवराज्याभिषेक दिनी संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावर मौन सोडलं आहे.
रायगडावरून संभाजीराजेंनी सूचक विधान करत म्हटलंय की, शिवाजी महाराजांच्या विरोधात अनेक बादशाही उभ्या होत्या. कुतुबशाही, आदिलशाही, मुघलशाही यांना सुद्धा लक्षात आले शिवाजी महाराज काहीतरी वेगळे रुप आहेत. शिवाजी महाराजांना अडवायला हवं. मग काय करायला हवं? त्यांनी ठरवलं बाप-लेकात भांडणं लावायची. शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्यात भांडणं लावली आणि शहाजीराजेंवर दबाव आणला. शिवाजी महाराजही म्हणाले माझ्या वडिलांवर एवढा दबाव आहे. स्वराज्य स्थापन करत असताना घराण्यात फूट पाडायची हा इतिहास जुना आहे असं त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते शाहू छत्रपती?
छत्रपती घराण्याला सर्वच पक्ष सन्मान देतात. त्यामुळे संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून छत्रपती घराण्याचा अवमान झाला, असे म्हणता येणार नाही, असे शाहू छत्रपती यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्पष्ट केले होते. संभाजीराजेंनी निवडणूक अपक्ष लढवावी, ही भाजप आणि त्यातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संभाजीराजे यांच्या खासदारकीची मुदत ३ मे रोजी संपल्यावर त्यांनी फडणवीस यांची अर्धा तास भेट घेतली. त्यात काय चर्चा झाली, हे समजले नाही. नंतर लगेच संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढण्याची व राज्यसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली. तुम्ही संघटना व पुढे तो राजकीय पक्ष करणार होता, तर मग तुम्हाला राज्यसभेची गरज नव्हती. तुम्हाला राज्यसभा हवी होती, अपक्ष लढायचे होते तर मग फडणवीस यांच्याइतकेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते व त्यांची संमतीही महत्त्वाची होती.
उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे; शाहू छत्रपतींचे मत
कदाचित त्यातून हे गणित जमलेही असते. त्यांना न भेटता, विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवारी जाहीर केली. तुम्हाला वाटले की, मी अपक्ष म्हणून लढणार, असे जाहीर केल्यावर महाराष्ट्रातील सारे पक्ष पाठिंबा जाहीर करायला माझ्या मागून पळत येतील. परंतु, तिथेच त्यांचे गणित चुकले. कदाचित ‘तुम्ही अपक्ष लढा, आम्ही पाठिंबा देतो’, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनीच सुचविले असेल असा दावा शाहू छत्रपतींनी केला.
शिवसेनेने काय म्हटलं?
छत्रपती शाहू महाराज केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी आदरणीय आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध होते आणि आजही आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर मी इतकेच म्हणालो की, कोल्हापूरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा सत्य जिवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा जिवंत ठेवली, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे संभाजीराजेंना टोला लगावला होता.
“संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली”; संजय राऊतांची टीका