"पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाण म्हणाले," गृहमंत्री म्हणाले असतील तर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:11 PM2024-07-22T13:11:37+5:302024-07-22T13:21:41+5:30
पुण्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांचा राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असा उल्लेख केल.
Rajya Sabha MP Ashok Chavan : पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये भाजपच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. अमित शाह यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. शरद पवार हे राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत असं विधान अमित शाह यांनी केले. त्यावरुन आता भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे. जेव्हा शरद पवार यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जाते. २०१४ ला भाजप सत्तेत आली मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले तेव्हा मराठा आरक्षण गेलं, असं म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शाह यांच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देताना खासदार अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला.
"भाजपचे लोक ज्याला एनडीए सरकार म्हणतात, ते काही महिन्यांपूर्वी मोदी सरकार होतं. याच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यामुळे शरद पवार नक्की काय आहेत हे भाजपनं ठरवावं. भाजपने महाराष्ट्रातील ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते नेते आज महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप होते ते अशोक चव्हाण अमित शाह यांच्या मागे बसले होते. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यापैकी ९० टक्के लोक आज भाजपमध्ये आहेत ते वॉशिंग मशीनमुळे," अशी खोचक टीका सुप्रिया सुळेंनी केली.
यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं. "महाराष्ट्राच्या राजकारणात ही गोष्ट लपलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेतही अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांनी अनेक उदाहरणे दिली. त्यामुळे देशाचे गृहमंत्री जेव्हा उदाहरण देतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यात गंभीरता आणि सत्य आहे. सुप्रिया सुळेंनी राजकीय आरोप केले आहेत. त्या मंत्री नाहीत आणि त्यांच्याकडे पुरावेसुद्धा नाहीत. देशाच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य गंभीर आहे हेच मला म्हणायचे आहे," असे अशोक चव्हाण म्हणाले.