राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान

By admin | Published: May 14, 2016 02:37 AM2016-05-14T02:37:56+5:302016-05-14T02:37:56+5:30

राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान आहे. अनेक गोष्टी इथे शिकता आल्या. संसदीय कारकिर्दीत दिवंगत उपराष्ट्रपती कृष्णकांत, भैरोसिंग शेखावत

The Rajya Sabha platform is like a university for me | राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान

राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान

Next

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
राज्यसभेचे व्यासपीठ माझ्यासाठी एखाद्या विद्यापीठासमान आहे. अनेक गोष्टी इथे शिकता आल्या. संसदीय कारकिर्दीत दिवंगत उपराष्ट्रपती कृष्णकांत, भैरोसिंग शेखावत व विद्यमान सभापती हमीद अन्सारी यांची तसेच ओजस्वी वक्ते अटल बिहारी वाजपेयी, महान अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी या तीन पंतप्रधानांची कारकिर्द जवळून अनुभवता आली याचा अतिशय भावपूर्ण शब्दांत उल्लेख विजय दर्डांनी निवृत्त सदस्यांच्या समारोप सोहळ्यात केला. यानिमित्ताने सभागृहाला एक शेरही दर्डांनी ऐकवला.
मुझको चलने दो अकेला..
अभी बाकी है मेरा सफर...
रास्ता अगर रोका गया,
तो कारवाँ हो जाउँगा.....
अठरा वर्षांपूर्वी या सभागृहात मी पहिल्यांदा आलो तेव्हा भारताच्या तिरंगी झेंड्याचा बिल्ला लावून राज्यसभेच्या सभागृहात तुम्हाला येता येणार नाही, असे मला सांगण्यात आले. भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेला तिरंग्याचा बिल्ला सभागृहातही लावण्यास सदस्यांना अनुमती असली पाहिजे, याचा आग्रह तेव्हापासून आजतागायत मी धरला. दुर्दैवाने राज्यसभेत आजही हा मुद्दा अनिर्णीतच आहे, याची मला खंत आहे. भविष्यकाळात तरी या विषयाचा निर्णय सभागृहाने अग्रक्रमाने घ्यावा, असे आग्रही प्रतिपादन खासदार दर्डांनी आपल्या भाषणात केले.
आदर्श संसदीय परंपरा, कोट्यवधी जनतेच्या आशा-आकांक्षा, देशाचा स्वाभिमान, भिन्न राजकीय विचारसरणी असली तरी संसदेच्या कामकाजात सामुदायिक शहाणपणा (कलेक्टिव्ह विस्डम)चे वैभव, राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून तरुण पिढीच्या अपेक्षा आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याचे भारतीय राजकारणातले अतुलनीय महत्त्व खा. दर्डांनी आपल्या भाषणात नमूद केले. संसदीय कामकाजात गोंधळ, गदारोळ ही नित्याची बाब झाली तरी महत्त्वाचे प्रश्न हे चर्चेतूनच सुटतात. म्हणूनच राज्यसभेसारख्या ज्येष्ठांच्या सभागृहाने चर्चा (डिबेट)ला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मतही याप्रसंगी दर्डांनी नोंदवले.
यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, देशातल्या तरुण पिढीचे आशास्थान राहुल गांधी व काँग्रेसच्या तमाम ज्येष्ठ नेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत दर्डांनी या सर्वांसह सभापती हमीद अन्सारी, उपसभापती कुरियन, सभागृहाचे नेते अरुण जेटली, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा आणि राज्यसभा सचिवालयाचे सचिव, तमाम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या दीर्घ कारकिर्दीत केलेल्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
समारोप कार्यक्रमाच्या शेवटी सभागृहाचे नेते अरुण जेटलींचे भाषण झाले. निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या आठवणीचे विविध प्रसंग नमूद करीत जेटली म्हणाले, विचारसरणी आणि पक्ष भिन्न असले तरी सार्वजनिक जीवनातली मैत्री अखंड आहे. सभागृहाचे सदस्यत्व संपत असले तरी सार्वजनिक जीवनातून कोणीही निवृत्त होत नाही. कुठल्या तरी वाटेवर कधी ना कधी आपली भेट होईलच. सभागृहातल्या सुखद स्मृती मनात साठवीत आपल्या आयुष्याचा पुढला प्रवास सुखद होवो, अशा शुभेच्छाही जेटलींनी याप्रसंगी दिल्या.

Web Title: The Rajya Sabha platform is like a university for me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.