'चारही उमेदवार जिंकून दिल्लीत जाणार, मविआला विश्वास, भाजपाला टोला, शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 10:00 PM2022-06-07T22:00:49+5:302022-06-07T22:01:38+5:30
Rajya Shabha Election: शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई - राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यातच महाविकास आघाडीतील समर्थकांच्या पाठिंब्याची गोळाबेरीज करून दुसरा खासदार राज्यसभेत पाठवण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी आज महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या आमदारांचं शक्तिप्रदर्शन मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच निवडणुकीनंतर दोन पार्ट्या करायच्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणी काही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार दिल्लीत जाणारच.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी तिसरा उमेदवार देणाऱ्या भाजपाला जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी राजकारणात थोडी सभ्यता असायला हरकत नव्हती पाहिजे.२२-२४ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. आता शेवटची राज्यसभेची निवणूक कधी झाली हे आठवावं लागते. एक परंपरा पाळली गेली असती तर बरं झालं असतं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान, आज ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या मविआच्या बैठकील ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांचे पारडे जड झाले आहे.