RajyaSabha Election Maharashtra: वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:33 PM2022-06-03T13:33:54+5:302022-06-03T13:34:53+5:30
भाजपाकडून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून शिवसेना हे पाऊल उचलणार आहे. सत्ता स्थापन करताना देखील शिवसेनेने आपले आणि समर्थन दिलेल्या आमदारांना असेच हॉटेलमध्ये ठेवले होते.
मविआने दिलेली विधान परिषदेला जागा सोडण्याची ऑफर भाजपाने नाकारल्यानंतर शिवसेनेने खबरदारीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार माघारी घेण्यास अवघा दीड तास शिल्लक आहे. यामुळे दोन्ही बाजुंकडून कोणताही तोडगा निघत नसल्याने जर निवडणूक झाली तर दगफटका नको म्हणून शिवसेनेने हालचाली सुरु केल्या आहेत.
भाजपाने महाविकास आगाडीचा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी येत्या ६ जून रोजी सर्व अपक्ष आमदारांना वर्षा बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी राज्यसभा निवडणुकीतील मतदानावरून चर्चा केली जाईल. जे अपक्ष आमदार तिथे येतील त्यांना आणि शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतीलच पंचतारांकीत हॉटेल ट्रायडन्टमध्ये ठेवण्यात येणार आहे.
या आमदारांना ८ ते १० जून याकाळासाठी हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. भाजपाकडून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून शिवसेना हे पाऊल उचलणार आहे. सत्ता स्थापन करताना देखील शिवसेनेने आपले आणि समर्थन दिलेल्या आमदारांना असेच हॉटेलमध्ये ठेवले होते. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणालेले...
शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, ही वस्तूस्थिती चर्चेमध्ये मांडली. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे पाटील यांनी सांगितले.