Rajyasabha Election Maharashtra: चर्चांना उधाण! मविआचे नेते फडणवीसांच्या भेटीला; दुसरीकडे घोडेबाजारावरून संजय राऊतांचे आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 10:48 AM2022-06-03T10:48:14+5:302022-06-03T11:02:22+5:30
काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे पलायन पुन्हा सुरु झाले असून याला जबाबदार कोण यांचा पर्दाफाश काश्मीर फाईल्स-२ काढून करावा, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
राज्य सभेच्या सहाव्या जागेवरून रस्सीखेच सुरु झालेली असताना महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधान आले आहे. शिवसेनेचे खासदार, राष्ट्रवादीचे मंत्री आणि काँग्रेसचे मंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी गेल्याने नेमकी कशावरून चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. याचवेळी नेमके संजय राऊतांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप केला आहे.
राज्यसभेच्या सहा जागा आणि सात उमेदवार उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीकडे आणि भाजपाकडे जादाची मते आहेत. अपक्षांची मते देखील आहेत. परंतू असे जरी असले तरी भाजपाला महाविकास आघाडीची मते घेतल्याशिवाय किंवा आघाडीला भाजपाची मते घेतल्याशिवाय सहावा उमेदवार निवडून आणणे कठीण आहे. दोन्ही बाजुने आमच्या मतांची बेगमी झाल्याचे दावे केले जात आहेत. परंतू, आजच्या बैठकीवरून कोणाच्याच हाती काही नसल्याचे दिसत आहे. अशावेळी राऊतांनी भाजपाचे नाव न घेता घोडेबाजाराचा आरोप केला आहे.
काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे पलायन पुन्हा सुरु झाले असून याला जबाबदार कोण यांचा पर्दाफाश काश्मीर फाईल्स-२ काढून करावा, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. याचबरोबर राज्यसभा निवडणुकीसाठी आमदार खरेदी करण्यात येत आहेत. हे सर्वात मोठे मनी लाँड्रींग आहे, ईडीने याकडे लक्ष द्यावे असा आरोप राऊत यांनी केला.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, सुनील केदार, शिवसेना खासदार अनिल देसाई हे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले आहेत.
सरसंघचालकांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो असे म्हणत राऊतांनी महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले असल्याचे राऊत म्हणाले. राज्यात घोडेबाजार सुरु आहे. हा पैसा कुठून येतो? तो कुठे जातो यावर केंद्रीय यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील आधीच बिघडलेले वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. प्रचंड घोडेबाजार सुरु झाला आहे, असे राऊत म्हणाले.
मी काही दिवसांपासून कोटी, कोटींमध्ये आकडे ऐकत आहे. ही सर्वात मोठी पैशांची अफरातफर आहे. हा घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ गेले असल्याचे राऊत म्हणाले.