RajyaSabha Election Maharashtra: मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:05 PM2022-06-03T13:05:59+5:302022-06-03T13:08:40+5:30
बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली.
मविआचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. यावेळी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना एकसारखीच ऑफर देण्यात आली. यामध्ये राज्यसभेचा उमेदवार माघारी घ्या, त्याबदल्यात विधानपरिषदेला जागा देऊ, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला भाजपाने नकार दिला आहे, तर आम्ही यावर विचार करतो, असे सांगून मविआ नेते बाहेर पडल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली. यावर दिल्लीवरून आम्हाला तुमची भूमिका योग्य असल्याचे कळविण्यात आल्याचे पाटील म्हणाले. शिवसेनेकडे एकडून तिकडून जोडलेली तीस मते देखील नाहीत. तर आमच्याकडे तीस मते आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे. त्यामुळे राज्यसभेची जागा आमच्यासाठी महत्वाची आहे. मविआने राज्यसभेचा उमेदवार मागे घेतला तर आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढविणार नाही, असे आम्ही मविआच्या नेत्यांना सांगितल्याचे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना फोन आला होता. राज्यसभेच्या उमेदवारीचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यावरून चर्चा करायची असल्याने आमचे ज्येष्ठ नेते सकाळी भेटण्यासाठी येतील, अशी विनंती त्यांनी केली. तेव्हाच फडणवीस यांनी त्यांना आम्ही उमेदवारी माघारी घेणार नाही, तुम्ही जो प्रस्ताव घेऊन याल त्यावरू विचार करू, असे म्हटले होते. आज त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, आम्ही आमचा तिसरा उमेदवार मागे घेणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...
शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, ही वस्तूस्थिती चर्चेमध्ये मांडली. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
गेल्या 20 वर्षांची परंपरा आहे की, राज्यसभा-विधान परिषदेत जर निवडणुका झाल्या तर क्रॉस वोटिंग होतं आणि प्रचंड गोंधळ होतो. परंतू ज्यावेळी बिनविरोध होते त्यावेळी वस्तूस्थितीच्या आधारे होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, राज्यसभेच्या भाजपला तीन जागा मिळाव्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. मविआच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच-तोच प्रस्ताव मांडला, असेही पाटील म्हणाले.