Rajyasabha Election: अतिरिक्त मतांवर सहाव्या जागेचा खेळ रंगणार; राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये चुरशीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:01 AM2022-05-13T09:01:31+5:302022-05-13T09:02:00+5:30
छत्रपती संभाजीराजे यांनी आजच उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवायचे असल्याने तिसरी जागा लढवून ती जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १० जूनला होणारी निवडणूक छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची होण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्ष त्यांच्याकडील अतिरिक्त मते कोणाकडे वळवतात यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असेल.
ही निवडणूक खुल्या मतदानाने होते. पक्ष प्रतोदांना दाखवूनच मतदान करावे लागते. त्यामुळे बंडखोरी वा दगाफटक्याची शक्यता कमीच असते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे विधानसभेची सदस्यसंख्या २८७ इतकी आहे. २८७ भागिले ७ अधिक एक म्हणजे ४४ इतका कोटा असेल. पहिल्या पसंतीची ४४ मते मिळालेल्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल.
भाजपचे संख्याबळ १०६ असून, त्यांना सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. हे लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार नक्कीच विजयी होतील. मात्र, तिसरा उमेदवार निवडून आणणे भाजपला अशक्य आहे. तथापि, आपल्याकडील अतिरिक्त मते भाजप ज्या उमेदवाराकडे वळवेल त्याला मोठा फायदा होईल.
एकेक उमेदवार जिंकूनही शिवसेनेकडे ११, राष्ट्रवादीकडे ९ मते शिल्लक राहतात. काँग्रेसचे संख्याबळ ४४ इतके आहे आणि त्यांच्याकडे एक उमेदवार जिंकल्यानंतर शिल्लक मते नसतील. प्रमुख राजकीय पक्षांकडे शिल्लक असलेल्या मतांवरच छत्रपती संभाजीराजे यांची भिस्त असेल. भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. प्रश्न असेल तो सहाव्या जागेचा. ही जागा स्वबळावर निवडून आणण्यासाठीचे संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही.
छत्रपती संभाजीराजे यांनी आजच उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपला राज्यसभेत संख्याबळ वाढवायचे असल्याने तिसरी जागा लढवून ती जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भाजप छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठीशी उभा राहिला, तर महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि डॉ. विकास महात्मे (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत (शिवसेना) आणि पी. चिदम्बरम (काँग्रेस) या सहा सदस्यांचा कालावधी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे.