नाराज असलो तरी राजीनामा देणार नाही - राकेश मारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2015 10:52 AM2015-09-09T10:52:42+5:302015-09-09T11:32:19+5:30
माझ्या राजीनाम्याचे वृत्त चुकीचे आहे, मी नाराज असलो तरीही राजीनामा देणार नाही असे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - मुंबई पोलिस आयुक्तपदावरून अचानक उचलबांगडी झाल्यामुळे नाराज झालेले राकेश मारिया यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांनी जोर धरू लागलेला असतानाच ' माझ्या राजीनाम्याचे वृत्त निरर्थक व निराधार अाहे. मी नाराज असलो तरीही राजीनामा देणार नाही' असे खुद्द मारिया यांनीच स्पष्ट केले आहे.
मारिया यांचा कार्यकाळ या महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली असून अहमद जावेद यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. या आकस्मिक बढतीमुळे नाराज झालेल्या मारिया यांनी होमगार्डचा पदभार स्वीकारला, मात्र त्यानंतर लगेच ते किरकोळ रजेवर गेले. त्यामुळे नाराज मारिया आता पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली असता खुद्द मारिया यांनाच आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.
दरम्यान हायप्रोफाईल शीना बोरा हत्याप्रकरणात मारियांनी विशेष लक्ष घातल्यानेच त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा सुरू असून त्यांच्या बदलीवर सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातू टीकेचा जोरकस सूर उमटला. त्यामुळेच शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्याकडे ठेवून सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.