बहीण-भावाच्या नात्यांमधील दृढ ‘विश्वासा’ची राखी
By admin | Published: August 3, 2016 03:16 AM2016-08-03T03:16:29+5:302016-08-03T03:16:29+5:30
रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे.
ठाणे : रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात येत असताना विशेष मुलांनी तयार केलेल्या क्वीलिंगच्या राख्यांना यंदा जबरदस्त मागणी आहे. जिद्द, अंगी असलेले कलागुण, नवनिर्मितीची आवड या गुणांच्या जोरावर ही मुले आकर्षक राख्या बनवित असून यंदाही त्यांच्या राख्यांना तुफान प्रतिसादाची अपेक्षा आहे. यंदा क्वीलिंगच्या राख्या बनवतांना आम्हाला जास्त मज्जा वाटते आहे, असे मुलांनी सांगितले.
गेल्या २० वर्षांपासून ‘विश्वास’ संस्थेतील विशेष मुले रक्षाबंधनाकरिता राख्या बनवत आहेत. आजतागायत ही कला या संस्थेने जोपासली आहे. राख्या वेळेत पूर्ण व्हाव्यात यासाठी एक महिन्याआधीच त्या बनवण्यास सुरूवात केली. अगोदर या विशेष मुलांना राखी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले गेले. एकदा त्यांना समजले की, मग ते स्वत:हून उत्तमोत्तम राख्या बनवतात. मुख्याधापिका मीना क्षीरसागर या नेहमीच राख्यांमध्ये नवनवीन प्रयोग करुन त्यांच्याकडून वेगवेगळ्या आकारांच्या, प्रकारांच्या राख्या बनवून घेत असतात. यंदा त्यांनी या मुलांना क्वीलिंगच्या आगळ््या राख्या बनवण्यास शिकवल्या आहेत. गोंडा राखी, मण्यांची राखी याप्रमाणेच क्वीलिंगच्या राख्या बनवण्यात मुले गुंतली आहेत. क्वीलिंगच्या राख्या बनवण्यात ही मुले इतकी मग्न झाली आहेत की, राखी बनवून पूर्ण होईपर्यंत त्यांचे चित्त विचलित होत नाही. राखी बनवल्यावर ती न्याहाळताना आपल्या हातून इतकी सुंदर कलाकृती घडली, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळतो. (प्रतिनिधी)
>दीड हजार राख्या तयार
क्वीलिंगच्या राख्यांमध्ये फुलांच्या डिझाईन्स तयार करुन त्या आकर्षक दिसाव्यात म्हणून मणी, मोतींचा वापर सजावटीकरिता केला जातो. आतापर्यंत दीड हजार राख्या बनवून तयार झाल्या असून त्यापैकी एक हजार राख्यांची विक्री देखील झाली असल्याचे मुख्याध्यापिका क्षीरसागर यांनी सांगितले. क्वीलिंग राख्यांमध्ये कलर कॉम्बिनेशनला खूप महत्त्व असल्याने या राख्या बनवण्यात मुले रमतात, असेही त्या म्हणाल्या. पेपरच्या पट्टया, क्वीलिंगची सुई याचा वापर करुन ही राखी तयार केली जाते. मुलांना सहज, सोप्या पद्धतीने काय वेगळे शिकविता येईल याचा विचार आम्ही सतत करीत असतो आणि नवनवीन प्रयोग अमलात आणतो, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवते. त्यापैकी दरवर्षी राख्या बनविण्याचा कार्यक्रम हा आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देणे हा हेतू यातून साध्य होतो. यावर्षी तीन हजार राख्या बनविण्याचे लक्ष्य आहे.
- अरविंद सुळे, संस्थापक, विश्वास गतिमंद मुलांचे केंद्र