"महिला नेत्याच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा"; जयंत पाटलांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:39 IST2025-03-02T18:37:41+5:302025-03-02T18:39:24+5:30
Jayant Patil: केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? हाच गंभीर प्रश्न असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

"महिला नेत्याच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा"; जयंत पाटलांचे आव्हान
Jayant Patil on Jalgaon case: राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. स्वारगेट बस डेपोतील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच, आता एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे घडली. भाजपच्या महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप कारवाई न झाल्याने स्वतः केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या द्यावा लागला. या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते टवाळखोर मुलं एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे सांगितले. तर त्या टवाळखोरा मुलांच्या पक्षाचे नाव लवकर जाहीर करून टाकावे, असे आव्हान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले.
काय म्हणाले जयंत पाटील?
"महिला नेत्याच्या मुलीशी काही टवाळक्यांनी छेडछाड केल्याची बातमी वाचली. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्याच्या काळात राज्यात मवालीगीरी वाढली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे असे गुन्हे महाराष्ट्रात राजरोसपणे घडत आहे. परंतु याबाबत शासन कोणतीही कडक पावले उचलत नाही म्हणून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही," अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरून रोष व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीशी काही टवाळक्यांनी छेडछाड केल्याची बातमी वाचली. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितका कमी आहे. सध्याच्या काळात राज्यात मवालीगीरी वाढली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे असे गुन्हे…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 2, 2025
त्या पक्षाचे नाव जाहीर करा...
"जर केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? असा गंभीर प्रश्न या प्रकरणातून उभा राहिला आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणतात की एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. असे असेल तर लवकरात लवकर त्यांनी त्या पक्षाचे नाव जाहीर करावे," असे आव्हानच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
"दुर्दैवाने त्या घटनेत एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत, ज्यांनी अतिशय वाईट प्रकारचं काम केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काहीना अटकही झाली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्रास देणे, छेडछाड करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.